घोडं 'मैदान' जवळ, मराठावीर मनोज जरांगेंचं भगवं वादळ नवी मुंबईत, आंदोलनाचा आजचा दिवस निर्णायक
Manoj Jarange : मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.
मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सर्वेक्षण सुरू असताना, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. आज त्यांच्या मार्चचा सातवा दिवस (Maratha Protest Day 7) आहे. मनोज जरांगेंची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत (Manoj Jarange In Navi Mumbai) दाखल झाली असून सकाळी दहाच्या सुमारास जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
मनोज जरांगेंची नेतृत्वाखालील खमराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. आज जरांगेंच्या या आंदोलनाचा निर्णायक दिवस माणला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सकाळी 5.30 वाजता नवी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर वाशी येथे त्यांची सभा होणार आहे. एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये राहण्याची सोय केली आहे.
मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर मात्र प्रश्न आहे मैदानाचा
मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगेंनी आधीच जाहीर केलंय. जरांगेंच्या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जोडले जातायत. जी बाब सरकारसाठी डोकेदुखीचं ठरतेय. कारण हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्ते जाम झालेत. मराठा बांधव मुंबईकडे तर निघालेत पण प्रश्न आहे तो आंदोलनाच्या मैदानाचा... आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 चं इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलंय.
मुंबईच्या सीमेवर अडवणार?
जरांगे मात्र आझाद मैदानावरच ठाम आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरलंय त्यामुळे मैदानही तितकंच मोठं असणं गरजेचं आहे. मराठा बांधवांच्या गर्दीमुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. म्हणूनच पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती केली. मार्ग कुठलाही असो मार्गदर्शक जरांगेंच आहेत. काहीच तासात मराठा बांधव मुंबईत दाखल होतील. मुंबईत तयारीला वेग आलाय. घोडं मैदान जवळ आलंय. आज नवी मुंबईत भगवं वादळ धडकले आहे. आता मराठ्यांचा हा मोर्चा मुंबईत पोहोचतो की या मोर्चाची वाट मुंबईच्याच सीमेवर अडवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा :
Manoj Jarange Patil : लेक आरक्षणासाठी मुंबईत, आई मात्र लेकराच्या काळजीने भावूक, जरांगेंच्या आईचं सरकारला आवाहन