Manhole Death : ड्रेनेज लाईन साफ करणासाठी मॅनहोलमध्ये उतरला, वरती येताच अंगावरुन गाडी गेली; उपचारादरम्यान मृत्यू
Manhole Death : या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या घटनेत ती गाडी सफाई करणाऱ्याच्या अंगावरुन गेल्याचं दिसून येतंय.
मुंबई: गोवंडीमध्ये मॅनहोलमध्ये सफाई करण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅनहोलमध्ये उतरल्यानंतर ड्रेनेज लाईन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अंगावर कार गेली. लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. ही घटना 11 जून रोजी घडली असली तरी आता या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
जगवीर यादव (37) हा कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरात ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला असता एक हुंडाई कार आली आणि त्याच्या अंगावर गेली. या प्रकरणात पोलिसांनी कारचालक विनोद आणि कंत्राटदाराला अटक केली आहे.
तो व्यक्ती मॅनहोलमध्ये अडकला
जगवीर यादव हा व्यक्ती सफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला होता. सफाई करत असताना तो खाली वाकून राहिला होता. अचानक समोरून एक कार आली आणि त्याच्या अंगावर गेली. त्यामुळे तो मॅनहोलमध्येच अडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कंत्राटदारासह चालक विनोद उधवानी याच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
ड्रेनेज साफसफाई करताना योग्य सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबद्दल पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर अर्जुन प्रसाद शुक्लाला आयपीसी कलम 279, 336, 338 आणि 304 अंतर्गत अटक केली.
गोवंडी परिसरात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबईतील गोवंडी परिसरातील शिवाजी नगर भागात मुंबई महानगरपालिकेकडून मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पावसाच्या दिवसामुळे मॅनहोलमधील मलनिस्सारण करण्याचे काम केले जात आहे. तेच काम गोवंडी परिसरात सुरु होते.
सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शिवाजी नगर येथील रस्ता क्रमांक 10 वर नव्याने पालिकेच्या कंत्राटदार कडून मलनिस्सारणाचे काम करण्यात येत आहे. यावेळी मॅनहोलमध्ये आत जाण्यासाठी यातील एक कामगार उतरला. तो थेट आत मॅनहोलमध्ये पडला. त्याला मदत करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार देखील मॅनहोलमध्ये उतरला. त्यानंतर दुसरा कामगार देखील मॅनहोलमध्ये पडला.
अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या दोन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. मॅनहोलमध्ये प्राणवायूची कमतरता असते. दरम्यान मॅनहोलमधील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटारमधून वीजेचा प्रवाह सुरु होता. त्यामुळे विजेचा झटका लागून या कामगारांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: