Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Maharashtra Unseasonal Rain : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभागानं राज्यात विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. बीड, जालना, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धुळे, वाशिम, सिंधुदुर्गमध्ये पावसानं हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असताना अवकाळी पाऊस हजेरी लावतत असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे.
Beed Rain : बीडमध्ये जोरदार पाऊस
बीड शहरासह परिसरात सलग तासभर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली होती. तर, शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले. सलग तासभर झालेल्या पावसामुळे नागरिकांना छत्री आणि रेनकोटचा वापर करावा लागला. बीड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असता तरी शेतकऱ्यांना मात्र याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
गेवराई तालुक्याला अवकाळी आणि गारपीटीने झोडपले
बीडसह गेवराई तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. गेवराई तालुक्यातील लुकामसला, भाटेपुरी, रोहितळ, तलवाडा शिवारात गारांचा मारा झाला. या पावसाने काढणीला आलेल्या बाजरीचे नुकसान झाले. हवामान विभागाने बीड जिल्ह्याला आज यलो तर उद्या ऑरेंज अलर्ट दिलाय. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवकाळीसह गारपीट झाल्याने काढणीला आलेली पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे.
सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या पट्ट्यात सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह सह्याद्रीच्या पट्ट्यात सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आज झालेल्या पावसानं आंबा,काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी आणि आसपासच्या परिसराला अवकाळी पावसानंने झोडपले. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. द्राक्ष बागांना पावसामुळं मोठा फटका बसला.
साताऱ्यात जोरदार पाऊस
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उंडाळे, ओंड सह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडासह पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबाळ उडाली आहे.गारपीट झाल्याने आंबा पिकासह काढणीस आलेल्या ज्वारी पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडल्याने दिलासा मिळाला आहे.
सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा पारगाव परिसरात अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.या वादळी वाऱ्यामुळे महामार्ग लगत असलेल्या हॉटेल समोर उभी असलेली एक दुचाकी झाड कोसळून चक्क चिरडली गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही… मात्र अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घरनिकी या गावाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले आहे. त्यापूर्वी पडलेल्या गारांनी शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे डाळींब बागांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, हरबरा ही पिके अगदी जमीनदोस्त झाली आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून शासकीय मदतीच्या अपेक्षेत आहे.
धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दोखाल अवकाळी पावसाला सुरुवात झाली. कळंब,वाशी तालुका परिसरात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसाने फळ पिकांसह काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
धुळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा सुरू असलेल्या अवकाळी मुळे उर्वरित शेती पिकांचे देखील नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटतेय. साक्री तालुक्यात तीन दिवसात दुसऱ्यांदा अवकळीचा तडाखा पाहायला मिळाला.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठ दिवसांपूर्वी दोंडाईचा व परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिके पूर्णतः उध्वस्त झाली होती. त्यातून शेतकरी सावरत नाहीत तोच आजच्या पावसाने उरलेसुरले पीकही धोक्यात आले आहे. या सततच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत. अनेक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
वाशिममध्ये पावसाची हजेरी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्याच्या काही भागात विजेच्या कडकटात वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. मालेगाव, शिरपूर , केळी, तर काही प्रमाणात रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात बीजवाई कांदा, आणि काढलेल्या हळद पिकाला नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जातंय..






















