नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार, युवकांचे विचार अपेक्षा समजून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Youth Policy of Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्याबाबत गठीत युवा धोरण समितीची पहिली बैठक पार पडली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी गठीत युवा धोरण समितीची प्रथम बैठक संपन्न झाली. या नव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेच राष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांची जोपासना यावर विशेष भर दिला जाणार आहे.
विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयार करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागांतील युवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार केले जाईल. या धोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचा समावेश करण्यात येणार आहे.
युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखले गेले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांना सहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच, युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीही संघटितपणे आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आ. प्रवीण दटके, आ. संतोष दानवे, आ. श्रीकांत भारतीय, आ. देवेंद्र कोठे, आ. सुहास कांदे, आ. राजेश पवार, आ. आशुतोष काळे, आ. प्रकाश सुर्वे, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.
























