Maharashtra Politics : महाविकास आघाडीत बिघाडी? विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस उत्सुक
Maharashtra Politics : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसही उत्सुक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.
Maharashtra Politics : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उत्सुक असताना आता काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुकता दाखवली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे असे आम्हाला वाटत असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दहा आमदार आहेत. शिवसेनेने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सगळ्यांच्या नजरा होत्या. काँग्रेसच्या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास आघाडीत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. या मुद्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडू शकते.
एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. त्यामुळे शिवसेना राज्याच्या विधानसभेत दुसऱ्या चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे सरकार गेल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदही गेले. तर, विधान परिषदेतील काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेला विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर दावा ठेवण्यासाठी आपल्या आमदारांना एकत्रित ठेवावे लागणार आहे. त्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीलाही आपली भूमिका पटवून द्यावी लागणार आहे.
दरम्यान, एका पक्षाला एक न्याय आणि दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय देण्याचा प्रयत्न राज्यपाल करत आहेत. लोकशाहीसाठी हे मारक असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. आम्ही जो निधी मंजूर केला होता तो थांबवण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह एकत्र बसू आणि लवकरच याबाबत राज्यपालांची भेट घेऊन पत्र देणार आहोत. राज्यपालांनीदेखील याकडे दुर्लक्ष केल्यास कोर्टात दाद मागू असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: