Abdul Sattar: मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ केली? अब्दुल सत्तार यांनी स्पष्टच सांगितले
Abdul Sattar: वर्षा बंगल्यांवरील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केली नसल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
Abdul Sattar: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केली असल्याचे चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नसल्याचे सत्तारक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर रविवारी, शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारची कामगिरी आणि निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर त्यांच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ केली असल्याची चर्चा होती. सत्तार यांनी म्हटले की, कालच्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नाही. मला राजकारणात 40 वर्ष झाली आहेत. मी असं का वागेल असा उलट प्रश्न करताना ही फेक न्यूज असल्याचे म्हटले.
वर्षा बंगल्यावरील बैठकीत मतदार संघातील कामांबाबत चर्चा करत होतो. काही कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे पूर्वीच्या कामाला स्थगिती द्या. मात्र आताच्या कामाला स्थगिती देऊ नका असं मत व्यक्त केले असल्याचे सत्तार यांनी सांगितले. वर्षातील बैठकीतून फक्त मीच नव्हे तर इतरही काही मंत्री निघून गेल्याचे सत्तार यांनी सांगितले. कामा संदर्भात बैठक झाल्यानंतर एका रुग्णाला पाहण्यासाठी जायचे असल्याने वर्षातून निघालो होतो, असेही सत्तार यांनी सांगितले.
नेमकं काय झाल्याची चर्चा?
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिंदे गटाकडून कामाचा आढावा घेण्यात येत होता.
या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिवीगाळ केली. या प्रकारामुळे शिंदे गटाच्या नेत्यांना धक्का बसला. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. शिवीगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
उद्धव ठाकरेंकडून चुकीचा दावा
उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने वेळ दिला होता. त्यामुळे आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही हा दावा करणे योग्य नसल्याचे सत्तार यांनी म्हटले. ठाकरे गटाने बनावट प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. हा मोठा घोटाळा समोर येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठलं याची हळहळ वाटत आहे. मात्र, त्याला जबाबादार कोण आहे हे ही सर्वांना माहीत आहे असेही सत्तार यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: