Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
![Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा maharashtra news sameer wankhede belong from scheduled caste community says mumbai Caste Scrutiny Committee Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/13/5687618b39c1ce65e266bc62ddd807861660370342885290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.
समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला.
नवाब मलिक यांचे आरोप काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरू होते. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली, वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिक यांनी याआधी केला होता. तर, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. या दोन्ही संघटनांना मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काय म्हटले?
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिन चीट दिली. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले.
दरम्यान, समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राला मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले असल्याची माहिती अॅड. नितीन सातपुते यांनी दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून याबाबत फारशी अपेक्षा नव्हतीच असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)