Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचा अपमान, हिंदूमध्ये फूट पाडायचा प्रयत्न; उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केल आहे.
Bhagat Singh Koshyari : मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना कोल्हापूरचे जोडे दाखवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले.
>> उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
> राज्यपाल पद ते एक मानाचं पद आहे. ते राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्या व्यक्तीनेही राखायला हवा. मात्र, कोश्यारी यांनी राखलेला नाही.
> राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या नशिबी अशी लोक का आली?
> महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. कोल्हापुरी जोडेसुद्धा जगप्रसिद्ध आहेत. हे जोडे दाखवायची वेळ आता आलीय. 'घी देखा, लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा' असं असेल तर त्यांना जोडा दाखवण्याची वेळ आलीय.
> कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे अनवधानानं आलेलं विधान नाही.
> त्यांची भाषण मुंबईतून लिहिली जातात की, दिल्लीतून माहिती नाही.
> मराठी माणसाचा अपमान केल्यानं मराठी जनता चिडलीय. मुंबई मराठी माणसानं लढून मिळवलीय.
> हिंदूंमध्ये फूट पाडण्याच काम हे नीचपणाचं आहे. तीन वर्ष ज्या राज्याचं मीठ खाल्लंत त्यांच्याशी ही नमकहरामी आहे.
> राज्यपालांच्या स्पष्टीकरणाबाबत मला बोलायचं नाही, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायलाच हवी. इथं राहून आगी कसल्या लावता?
> यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे याचा संबंधितांनी विचार करावा.
> आमच्यासोबतसुद्धा अमराठी लोकं आहेतच. वर्षानुवर्ष आहेत, पण आम्ही कधी फूट पडू दिली नाही
> मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यातच यांचा जीव जडलाय, हे आता स्पष्ट झालंय. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे
राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटले?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठं योगदान आहे.