मुंबई : 18 ते 44 या वयोगटातील सर्व नागरिकांचं लसीकरण 1 मेपासून होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. तर 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 15 मेनंतर करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लसीच्या पहिल्या डोससाठी आता गर्दी करु नका, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे. तर सध्या लसीकरणासाठी दुसरे डोस घेणाऱ्यांना अधिक प्राधान्य दिलं जातंय अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे की, 18 ते 44 या वयोगटाचा विचार आम्ही 15 नंतर करु. 15 मेनंतर आम्ही लसीकरणासंदर्भातील सूचना कळवण्यात येतील. त्यावेळी लसीकरण कुठे, कधी आणि केव्हा होणार याचा विचार केला जाईल. आता सध्या 45 ते 60 वर्षांच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसला लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, पहिल्या डोससाठी घाई गडबड करु नका."


दरम्यान, आजही लसीकरणासाठी मुंबईकरांच्या लसीकरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसून आल्या. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र म्हणून ओळखलं जाणारं वांद्रे येथील लसीकरण केंद्राबाहेरही नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. गोरेगाव पूर्वेकडील नेस्को लसीकरण केंद्रावरही नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकही होते. पण लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमध्ये कोरोना नियमांचं मात्र उल्लंघन होताना दिसून आलं. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. त्यामुळे आता लसीकरण केंद्रच कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरतायत का? किंवा ठरतील का? अशी भिती व्यक्त होत आहे. 


राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून या लसीकरण मोहिमेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असताना देशाच आणि राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :