मुंबई : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धडकली असतानाच सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तिसरी लाटही धडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या लाटेत राज्य सरकार ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण झाले पाहिजे हे लक्ष्य सरकारने ठेवलं आहे. सोबतच राज्य सरकारने रेमडेसिवीर, ऑक्सिजन स्टोअरेज टॅंक, ऑक्सिजनबाबत ग्लोबल टेंडर काढलं आहे. 


राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे, अन्यथा तिसऱ्या लाटेत नागरिकांना अजून फटका बसू शकतो, अशी भूमिका आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी मांडली. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेत राज्य ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे हे सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी येत्या एक-दीड महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारण आठ ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचं टार्गेट सरकारसमोर आहे. हे प्लांट तयार झाले तर राज्यात अधिकचा 350 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होईल. 


याशिवाय राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन स्टोअरेज टॅंक, ऑक्सिजनबाबत ग्लोबल टेंडर काढलं आहे. 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 132 पीएसए प्लांट, 27 ऑक्सिजन आयएसओ टँक, 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन, रेमडीसीविर 10 लाख या पाच गोष्टींची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत जास्तीत जास्त लसीकरण आणि ऑक्सिजनची पूर्तता या दोन मुद्द्यांवर राज्य सरकारचे जास्त लक्ष आहे. 


लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा इशारा
देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याला लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने 1 मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.