मुंबई : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून या लसीकरण मोहिमेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास 1 मे पासून एवढ्या लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. 


Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही


सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरण सुरु आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लसीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात कोविन अॅपवरुन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कोविड अॅपवर नोंदणी केल्याशिवास लस मिळणार नाही. थेट लसीकरण केंद्रावर आल्यास लस मिळणार नाही. त्यामुळे लस घ्यायची असेल तर कोविन अॅपवर नोंदणी करावीच लागेल, असं राजेश टोपें यांनी स्पष्ट केलं. तसेच कोविन अॅपवर नोंदणी न करत उगाच लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नका असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे. 


Corona Vaccine Registration : लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?



कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळणार आहे. कोवॅक्सिनचे जूनपर्यंत महिन्याला प्रत्येकी 10 लाख डोस मिळणार आहेत. जुलैनंतर ते 20 लाख डोस मिळतील. तसेच ऑगस्ट दरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.