मुंबई : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी, 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. बुधवारी जवळपास 1 कोटींहून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.  


MyGovIndia याट्विटर हँडलवरुन यांसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "महामारी संपवण्याच्या दिशेने टाकलेलं लसीकरण हे महत्त्वाचं पाऊल आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेसाठी एक कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे." दरम्यान, कोरोना व्हायरस वॅक्सिनसाठी 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर  Cowin आणि Aarogya Setu अॅप क्रॅश झाल्याच्या तक्रारी लोकांकडून करण्यात येत होत्या. 



लसीकरण नोंदणी करताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं होतं. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत. दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. 


Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?


काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन


नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले जात आहेत. ट्वीटरवर वेटिंग फॅार ओटीपी, नो ओटीपी, स्लॅाट, ओटीपीज, अपॅाईंटमेंट असे ट्रेंड सुरु होते.  आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झालं होतं. 


आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरु होईल. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :