(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Crisis: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही- शरद पवार
राज्यात सध्याच्या घडीला आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच अहोरात्र मेहनत सुरु आहे.
Maharashtra Corona Crisis: : महाराष्ट्रातील सध्याची कोरोना स्थिती आणि एकंदर घडामोडी पाहता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात सध्याच्या घडीला आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच अहोरात्र मेहनत सुरु आहे. यातच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनंही काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या 'ब्रेक दि चेन' या मोहिमेला सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून विरोध होत आहे, पण याशिवाय संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय नाही, ही बाब शरद पवार यांनी स्पष्ट केली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची नियमावली लागू करण्यासंदर्भात केंद्रही आग्रही असल्याचं ते यावेळी म्हणाले. आपण देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला असून, राज्यात ज्या काही त्रुटी आहेत, त्यावरही काम करण्याबाबत चर्चा केली. ज्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकार आणि केंद्राची यंत्रणा राज्यांच्या सोबत आणि महाराष्ट्रासोबत असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी पक्षात मतभिन्नता?
शरद पवार यांनी आपल्या फेसबुक live मध्ये केंद्र सरकर राज्याला सहकार्य करत आहे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी फोन वरून चर्चा केली केंद्राचे आरोग्य खाते राज्याच्या मागे पूर्ण शक्तीने पाठीशी आहे असं विधान केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशदयक्ष ट्विट करून केंद्रावर टीका करत आहेत की केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारची राज्याबाबत असलेल्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी पक्षात मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे.
बंधनं आणली की अस्वस्थता येते...
राज्यातील मोठ्या वर्गात कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधांमुळं कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्याच धर्तीवर बंधनं आली की, अस्वस्थता येतेच हा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित केला. कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला या संकटाची झळ बसली. उद्योगधंदे बंद झाल्यामुळं व्यापारी वर्गाचं नुकसान झालं, भाजीपाल्यासारखा नाशीवंत शेतमाल घेणाऱ्या शेतकऱ्याला या मालाचं नेमकं काय करावं याचा प्रश्न उभा आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्वातून पुढे जाताना यशसिद्धीचा मार्ग काढायचा असेल तर, या सर्व परिस्थितीला आपण धैर्यानं सामोरं गेलंच पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
समाजातील सर्व घटकांना विनंती करतो...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजात असणारी सरकारप्रतीची भावना आणि या विषाणूच्या संसर्गाची भीती पाहता शरद पवार यांनी सर्व घटकांना उद्देशून एक विनंती केली. मी समाजातील सर्वच घटकांना विनंती करतो की, आपल्याला वास्तुस्थिती नाकारता येणार नाही. नागरिकांच्या जिवीताच्या संरक्षणार्थ काही अपरिहार्ह निर्णय घेतले जावेत आणि ते घेतले जातही आहेत. पण, या परिस्थितीमध्ये सर्वांचंच सहकार्य गरजेचं आहे.
समाजासाठी घेतले जाणारे निर्णय़ पाहता यामध्ये जनतेच्या सहकार्याची नितांत गरज असून, प्रसार माध्यमांपासून, राजकीय नेते, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना आग्रहाची विनंती करतो की कोरोना काळात राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असं म्हणत राज्यातील जनता यंत्रणेला सहकार्य करतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सोबतच सामुदायिक प्रयत्नांच्या माध्यमातून आपण कोरोनावर नक्कीच मात करु असा दृढ निश्चयही त्यांनी व्यक्त केला.