मंत्री अस्लम शेख यांच्या बॉडीगार्डला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दिगंबर यांच्या तक्रारीनंतर तीन जणांवर भादंवि कलम 353, 332, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.
मुंबई : कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या बॉडीगार्डवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी अस्लम शेख एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अंधेरी वर्सोवा येथील एका गुरुद्वारामध्ये जात असताना ही घटना घडली.
अस्लम शेख यांचा ताफा पुढे जात असताना त्यांचे बॉडीगार्ड दिगंबर पानसरे यांच्या लक्षात आले की रस्त्यात एक दुचाकी उभी होती. ज्यामुळे मंत्री अस्लम शेख यांची गाडी घेऊन जाण्यास अडचण येत होती. त्यानंतर दिगंबर गाडीतून खाली उतरले आणि दुचाकी काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांची तीन लोकांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की तिघांनी मिळून दिगंबर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ सुरु केली.
पोलिसांनी माहिती दिली की, बॉडीगार्ड दिगंबर यांच्यासोबत धक्काबुक्की-शिवीगाळ करणाऱ्या आरोपींमध्ये एक महिलाही होती. या घटनेनंतर दिगंबर यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्याआधारे पोलिसांनी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दिगंबर हे पोलिस कॉन्स्टेबल असून ते मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.
दिगंबर यांच्या तक्रारीनंतर तीन जणांवर भादंवि कलम 353, 332, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.