Aaditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसे शिवसेनेवर वारंवर हल्लाबोल करत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी नवी रणनीती आखत आहे. त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आखला जात आहे.
मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार असल्याचं कळतं. यापूर्वी संपूर्ण कुटुंब अयोध्येला गेलं होतं. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. आता मे महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आखला जाईल असं माहिती मिळत आहे.
हिंदुत्त्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी कायमच महत्त्वाचा राहिला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन आणि निर्माण कार्य सुरु झाल्यापासून शिवसेना नेत्याचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोण असेल याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दौरा जाहीर झाल्यावर याबाबत स्पष्टता येईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत यासंदर्भात चर्चा केली. हा दौऱ्याच्या नियोजनाबाबतची बैठक संजय राऊत यांनी घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणत सध्या हिंदुत्त्वाचा मुद्दा गाजत आहे. हनुमान चालीसाचा मुद्दा पुढे करुन मनसे स्वत:ची हिंदुत्त्ववादी अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून भाजप सेनेवर हिंदुत्त्व सोडल्याची टीका सातत्याने करत आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसे शिवसेनेवर वारंवर हल्लाबोल करत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी नवी रणनीती आखत आहे. त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आखला जात आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्याच्या दौऱ्यावर जातील.
महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनाला गेले होते. आता आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. यामुळे शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडलेला नाही, असा संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.