Budget Session 2021 : अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिला आठवडा सरला, विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर!
Budget Session 2021 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला आहे. पहिल्या आठवड्यात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. आता दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आता उरलेल्या दिवसात सरकार विरोधकांना निष्प्रभ करणार की विरोधक सरकार वर कुरघोडी करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरलं.
Budget Session 2021 : गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळावं लागलं. त्यानंतर कोरोना काळात अधिवेशन हे दोन दिवस फक्त होत राहिली. त्यामुळे हे होणारे अधिवेशन हे पहिले आठ दिवस चालणारे अधिवेशन आहे. ज्यात विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याचे चित्र पहिल्या पाच दिवसात दिसले.
पहिला आठवडा असा राहिला
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. विधान भवन बाहेर आणि आत आंदोलन केले. सभागृहात कामकाज सुरू होताच हा प्रश्न मांडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर चर्चा होत नाही तोपर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णयाची घोषणा केली. तिथे विरोधकांना बळ मिळाले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी धुवांधार बॅटिंग केली. राज्यपालांना विमानातून उतरवणे ते कोरोना काळातील भ्रष्टाचार, संजय राठोड, मुंबईतील मेट्रो सारखे प्रकल्प, आरे कार शेड ,कोरोना असून मुंबईत सुरू राहणारे पब , राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांनी सरकार वर हल्लाबोल केला.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष होते. मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व, दिल्लीतील शेतकरी आंदोलन,पेट्रोल डिझेल दरवाढ या मुद्द्यांवरून टीका केली. आपल्या भाषणात विरोधकांच्या राजकीय मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत सडेतोड उत्तर तर दिली पण प्रशासकीय बाबींवर मात्र अपेक्षित उत्तर आले नाही.
सरकारमधील तिन्ही पक्षांचा समन्वयाचा अभाव
सभागृहात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा समन्वयाचा अभाव दिसून आला. पुरवणी मागण्या असो किंवा राज्यातील कायदा सुव्यवस्था या विषयावर विरोधी पक्षातील नेते आमदार भाषण करताना सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे उत्तर देताना दिसले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील काही मंत्री आजारी याचा फटका या अधिवेशनात बसला. फ्लोअर मॅनेजमेंट करताना सरकार कमी पडले असं चित्र होतं. काही वेळा ज्या विभागावर चर्चा सुरू आहे त्याचे मंत्री उपस्थित नसल्याची टीका ही विरोधकांनी केली. मंत्री सभागृहात उपस्थित नाही ही बाब वारंवार विरोधकांनी लक्षात आणून दिली.
सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरण तापणार
सरकारची सगळ्यात मोठी कोंडी झाली ती उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित रित्या आढळलेल्या गाडीबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिल्यानंतर. त्या गाडीचा मालक आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे संबंध,त्यांचे फोन रेकॉर्ड याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह समोर मांडली. त्या गाडीच्या मालकाला सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आणि अवघ्या काही मिनिटात त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह खाडीत सापडला हे वृत्त आले आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला.
गृह खातं विरोधकांच्या निशाण्यावर
अधिवेशन काळात गृह खात्यावर विशेष जबाबदारी असते.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर लक्ष ठेवावे लागते.कोणत्याही घटनेने गालबोट लागू नये कामकाजात सरकारवर दबाव येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. जळगाव वसतिगृहातील प्रकरण समोर आले तरी त्यातील सत्य वेगळं असल्याने सरकारला दिलासा मिळाला पण अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला आणि याची माहिती गृह खात्याला नव्हती. विरोधी पक्षनेते इतकी माहिती देतात पण गृह खाते अंधारात हे चित्र समोर आले. यावर गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी उत्तर दिले सावरून घेण्याचा प्रयत्न केला तरी सरकार बॅकफूटवर असल्याचे स्पष्ट झाले.
आठ मार्च रोजी अजित पवार अर्थसंकल्प मांडणार
आर्थिक पाहणी अहवालात कोरोनाची मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचे आर्थिक अहवालात दिसले. आठ मार्च रोजी अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत.. आता उरलेल्या तीन दिवसात अर्थसंकल्प मंजूर करून घेणे,विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक हे सरकारपुढे आव्हान आहे. तीन दिवसात सरकार विरोधकांना निष्प्रभ करणार की विरोधक सरकार वर कुरघोडी करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरलं.