एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केलेल्या परेलमधल्या चाळीत अनुयायांचा ओढा
6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालं होतं. या दिवशी देशभरातील भीम बांधव बाबासाहेबांना नमन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर दाखल होत असतात. याच वेळी हे भीम बांधव परेल परिसरातल्या बीआयटी चाळीत येऊन बाबासाहेबांची सुवर्ण वर्ष ज्या दोन खोल्यांमध्ये गेली आहेत, त्या खोलीमध्ये येऊन ते बाबासाहेबांचं स्मरणही करतात.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई इथल्या परेल परिसरातील ज्या बीआयटी चाळीमध्ये आपल्या आयुष्यातील 22 वर्षांचा कालखंड घालवला, त्याच जागेचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होतं. याच इमारतीमधून अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत.
मुंबईतील परेल परिसरातील चार मजली वास्तू आजही या ऐतिहासिक गोष्टी आपल्या उरात बाळगून उभी आहे. या वास्तूमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल बावीस वर्ष घालवली. या वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50 आणि खोली क्रमांक 51 या दोन खोल्यांमध्ये बाबासाहेबांचा संसार थाटला. पण देशातील अनेक ऐतिहासिक घडामोडी, मनन, चिंतन, अभ्यास बाबासाहेबांनी खोली क्रमांक 50 मध्ये केला.
बीआयटी चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर जाताना एक वेगळी ऊर्जा इथे येणाऱ्याला मिळते. कारण या चाळीत असणाऱ्या खोली क्रमांक 50 आणि खोली क्रमांक 51 या दोन्ही खोलीच्या मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत . देशभरातून येणारे बाबासाहेबांचे अनुयायी, अभ्यासक, पर्यटक हे या परिसरात येऊन या प्रतिमांचा समोर नतमस्तक होतात. खोली क्रमांक 50 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यास करायचे, चिंतन करायचे याच खोलीतून बाबासाहेबांनाही प्रेरणा मिळायची. बाबासाहेबांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची साक्षीदार ही खोली क्रमांक 50 आहे, असंच आपल्याला म्हणावे लागेल. कारण देशभरातील मान्यवर आणि छत्रपती राजर्षी शाहूंनी याच खोलीत येऊन बाबासाहेबांची भेट घेतली होती. बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन केलं होतं, त्याचे एक पदाधिकारी कालिदास सखाराम ताडीलकर हे होते. 1934 मध्ये बाबासाहेबांनी त्यांना ही खोली दिली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे ही खोली असून ही खोली पाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना, अभ्यासकांना या खोलीबद्दल माहिती दिली जाते.
बाबासाहेब देशातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत खोली क्रमांक 50 मध्ये चर्चा करत असले, तरीही खोली क्रमांक 51 मध्ये माता रमाई येणार्या जाणार्या पाहुण्यांचा पाहुणचार करायच्या. खोली क्रमांक 51 म्हणजे या घराचं स्वयंपाक घर. सध्या या खोलीत महाडचे भागुराम खैरे हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहेत. भागुराम खैरे हे बाबासाहेबांचे नातेवाईक आहेत. 1934 साली जेव्हा बाबासाहेब हे राजगृह या घरांमध्ये स्थलांतरित झाले, त्यावेळी त्यांनी भागूराम खैरे यांच्या काकांना ही खोली राहण्यासाठी दिली होती.
बीआयटी चाळ क्रमांक 1 या इमारतीत बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जीवन प्रवासातील 22 वर्षांचा कालखंड आजही साक्ष देत आहे. 1912 ते 1934 या कालावधीमध्ये बाबासाहेब या चाळीत मध्ये राहत होते. 1912 मध्ये पुत्र यशवंत यांचा जन्म झाला होता. त्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना या कालावधीमध्ये भारतात घडल्या होत्या. 1934 साली बाबासाहेब या चाळीतून राजगृह या घरांमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर या चाळीतील रहिवाशांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर या दोन्ही खोल्यांच्या मध्यभागी बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा लावून हे छोटेसे स्मारक जपण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांचं दोन खोल्यांचं ते छोटेखानी स्मारक पाहण्यासाठी या चाळीत येत असतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चाळीतून आणि ज्या दोन खोलीतून आपला प्रवास सुरु केला, त्या पवित्र जागेचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. जगभरातील बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी परेल परिसरातील ही चाळ एक प्रेरणादायी राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी त्यांनी आज केली आहे.
6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालं होतं. या दिवशी देशभरातील भीम बांधव बाबासाहेबांना नमन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर दाखल होत असतात. याच वेळी हे भीम बांधव परेल परिसरातल्या बीआयटी चाळीत येऊन बाबासाहेबांची सुवर्ण वर्ष ज्या दोन खोल्यांमध्ये गेली आहेत, त्या खोलीमध्ये येऊन ते बाबासाहेबांचं स्मरणही करतात. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या गोष्टीची दखल घेऊन या चाळीचं रुपांतर राष्ट्रीय स्मारकामध्ये करावं अशीच अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement