तिकीट कापलं, आता किरीट सोमय्यांना प्रचारापासून लांब ठेवण्याची शिवसैनिकांची मागणी
मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे त्यांचा पत्ता कट केल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई : भाजपचे ईशान्य मुंबईचे विद्यमान आमदार किरीट सोमय्या यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीची उमदेवारी नाकारली आहे. या धक्क्यानंतरही सोमय्या यांना आणखी एक धक्का बसला आहे. किरीट सोमय्या यांना निवडणुकीच्या प्रचारापासूनही लांब राहावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपने किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र नाराजी लपवत मनोज कोटकांचा प्रचार करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे किरीट सोमय्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. मात्र सोमय्या मनोज कोटक यांच्या प्रचारात दिसत असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रचारात किरीट सोमय्या असल्याचे शिवसैनिक प्रचारापासून लांब दिसत आहेत. सोमय्या प्रचारात असतील तर प्रचार कसा करायचा? असा सवाल शिवसैनिकांनी मनोज कोटक यांना विचारला. त्यामुळे किरीट सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी शिवसैनिकांनी मनोज कोटक यांच्याकडे केली आहे.
किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा प्रखर विरोध होता. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा असेल, असं शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेनेच्या दबावामुळेच किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाला आणि आता त्यांना प्रचारापासून लांब ठेवण्यासाठीही शिवसैनिकांनी प्रयत्न सुरु केले आहेत.