लोको पायलट विनोद जांगिड यांनी इमर्जन्सी ब्रेक मारले अन् वांगणी रेल्वे स्थानकावरील 'तो' अपघात टळला
विनोद जांगिड यांनी ईमर्जन्सी ब्रेक मारला आणि 105 किलोमीटर प्रतितास एवढ्या प्रचंड वेगात असणारी एक्स्प्रेस अवघ्या तीन सेकंदात 80 ते 85 किलोमीटर प्रति तास या वेगावर येऊन पोहोचली. आणि याचाच फायदा मयूर शेळकेला झाला.
![लोको पायलट विनोद जांगिड यांनी इमर्जन्सी ब्रेक मारले अन् वांगणी रेल्वे स्थानकावरील 'तो' अपघात टळला Loco pilot Vinod Jangid hits emergency brake and help mayur shelke in vangani station लोको पायलट विनोद जांगिड यांनी इमर्जन्सी ब्रेक मारले अन् वांगणी रेल्वे स्थानकावरील 'तो' अपघात टळला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/25/37b2ae03976588dc7de15a6e7b384088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळकेने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मयूर सोबत आणखी एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आजपर्यंत कधीच पुढे आली नाही. त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही, त्यांना कुणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील गेले असते. ती व्यक्ती म्हणजे त्या एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड.
विनोद जांगिड त्यादिवशी उद्यान एक्सप्रेस चालवत मुंबईच्या दिशेने येत होते. वांगणी स्टेशनच्या आधी एक खूप मोठे वळण आहे. त्यामुळे वांगणी स्टेशन दिसत नाही. असे असतानाही गाडी 105 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगात घेऊन येताना, वळण पूर्ण झाल्यानंतर अचानक समोर ट्रॅकवर विनोद यांना तो लहान मुलगा आणि त्याच्या समोर धावताना मयूर शेळके नजरेस पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता समयसूचकता दाखवली आणि आधी इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळे 105 किलोमीटर प्रतितास एवढ्या प्रचंड वेगात असणारी एक्स्प्रेस अवघ्या तीन सेकंदात 80 ते 85 किलोमीटर प्रति तास या वेगावर येऊन पोहोचली. आणि याचाच फायदा मयूर शेळकेला झाला. ब्रेक दाबल्याने ती गाडी पुढे स्थानकात येऊन थांबली. त्यावेळी विनोद यांना संपूर्ण प्रसंग समजला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
ते थरारक सात सेंकद! जिगरबाज पॉईंटमन मयुर शेळके म्हणाला, काही क्षण भीती वाटली, मात्र...
असे अनेक प्रसंग विनोद यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवले आहेत. मात्र आजपर्यंत त्यांना कुणी साधी शाबासकी देखील दिली नाही. लोको पायलट आणि मोटर बंद अशा घटना झाल्यानंतर देखील मन स्थिर ठेवून हजारो प्रवाशांचे प्राण सुरक्षित राखून गाडी चालवत असतात. अनेक वेळा जनावरे रेल्वे ट्रॅकवर येतात, त्यांनी बाजूला व्हावे यासाठी लोको पायलट हॉर्न वाजवतात. मात्र शेवटी त्या जनावराला धक्का लागतोच आणि ते मरते. अशा वेळी देखील गाडी चालवणारे कर्मचारी दुःखी होतात. जर चुकून एखाद्या व्यक्तीला ट्रेनचा धक्का लागून तो मृत झाला तर दो- तीन दिवस झोप येत नाही, असे विदारक अनुभव विनोद यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. त्यामुळे विनोद सरांचे कार्यदेखील खूप मोठे आहे.
एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला....
वांगणी स्टेशनवर काय घडलं होतं?
मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षांचा एक मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालता चालता तोल जाऊन तो मुलगा ट्रॅकवर पडला. मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवर पडला नेमक्या त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. त्या मुलाची अंध आई आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बावरलेल्या आईला मुलगा नेमका कुठे पडला हेच कळत नव्हतं. ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून मुलगा कसाबसा उठून प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता. परंतु प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने त्याला काही चढता येत नव्हतं. ही बाब तिथे असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी पाहिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. एक्स्प्रेस काही सेकंदाच्या अंतरावर असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते मुलापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःही वायुवेगाने प्लॅटफॉर्मवर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार तिथल्या प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयुर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर कदाचित त्या अंध आईने आपल्या मुलाला गमावलं असतं. परंतु मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयुर शेळकेने वाचवलं.
पॉईंटमन मयुर शेळके यांच्याकडून माणुसकीचं दर्शन, बक्षिसातील अर्धी रक्कम अंध मातेला देणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)