Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा जागचा हलेना, गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला जाताच पाट हलला, विसर्जन कधी होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. मात्र, तराफ्याची उंची जास्त असल्याने अजूनही लालबागच्या गणपतीचे विसर्जन होऊ शकलेले नाही.

Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणेश मंडळ असा लौकिक असणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर यंदा मोठी नामुष्की ओढवली आहे. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी दुपार उलटूनही अद्याप लालबागचा राजाचे विसर्जन होऊ शकलेले नाही. गेल्या साडेसहा तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर (Girgaon chowpatty)अडकला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा आणण्यात आला होता. हा तराफा गुजरातवरुन आणण्यात आला आहे. मात्र, याच तराफ्यामुळे लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja) विसर्जन अद्याप होऊ शकलेले नाही. लालबागचा राजा रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर दीड-दोन तासांत लालबागचा राजाचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, या काळात समुद्राला भरती आली. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी जो तराफा तयार करण्यात आला होता, त्याची उंची जास्त असल्याने गणपतीची मूर्ती त्यावर उचलून ठेवावी लागणार होती. मात्र, भरती आल्याने लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर उचलून ठेवणे शक्य झाले नाही. परिणामी गेल्या साडेसहा तासांपासून लालबागचा राजा समुद्रात अडकून पडला आहे.
गेल्या अनेक तासांपासून लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश येत नव्हते. अशात गणपतीचा पाट जड झाल्याने लालबागचा राजाची मूर्ती जागेवरुन हलत नव्हती. अखेर दुपारी गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मदतीला धावून आले. या सगळ्यांनी मिळून लालबागचा राजाचा पाट हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लालबागचा राजाचा पाट हलला. त्यामुळे आता लालबगचा राजा मंडळाने सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, अजूनही पाण्याची पातळी खाली न आल्याने लालबागचा राजाला विसर्जनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लालबागचा राजा आणि तराफ्याची पातळी एका उंचीला आल्यानंतर गणपतीची मूर्ती त्यावर सरकवली जाऊ शकते. सध्या भरती असल्यामुळे स्वयंचलित तराफा मोठ्याप्रमाणावर हलत आहे. सकाळपासून समुद्राला भरती असल्यामुळे काहीवेळापूर्वी लालबागचा राजा कंबरेपर्यंत पाण्यात बुडाला होता. मात्र, आता समुद्राची भरती ओसरल्याने पाणी पातळी खाली आली आहे. मात्र, पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे खाली येण्यासाठी आणखी दोन तास जावे लागतील. त्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर चढवून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेले जाईल. मात्र, समुद्राला संध्याकाळी ओहोटी येणार आहे. तोपर्यंत लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वाट पाहावी लागू शकते, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काहीवेळापूर्वीच तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने लालबागचा राजा असलेल्या भागात समुद्राची पाहणी केली आहे.
लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता मंडपातून विसर्जनासाठी निघाला होता. त्याला आता 27 ते 28 तास उलटले आहेत. आजपर्यंत लालबागचा राजाच्या विसर्जनाला कधीही इतका वेळ लागला नव्हता. त्यामुळे या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वी अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केले जात होते. मात्र, यंदा लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरुन आणलेला तराफा वापरला जात आहे. त्यामुळे लालबागचा राजाच्या विसर्जनाला प्रचंड उशीर झाला आहे. इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या. मात्र, लालबाग राजा मंडळाने तराफ्यावरुनच विसर्जन करायचे, हा निर्णय कामय ठेवला. यावरुन आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
























