(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'आम्हालाही दंगे नकोत, शिवसैनिकांना डोकी थंड ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश' : किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar : मुख्यमंत्र्यांचं संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. आमच्याकडून काही घडावं याकरता प्रयत्न केले जात आहेत, पण ते होणार नाही, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय.
Kishori Pednekar on Devendra Fadnavis : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भोंगा विवादावरुन भाजप आणि देवेंद्र फडणीवासांवर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, हनुमान चालिसाचा आधार घेऊन काही भेसूर चेहरे महाराष्ट्र, मुंबईला तोडू पाहत आहेत. ठरवून गेम करण्याचं राजकारण सुरु आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला दंगे नकोत, शिवसैनिकांना डोकी थंड ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत नापाक इरादे चालू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. आमच्याकडून काही घडावं याकरता प्रयत्न केले जात आहेत, पण ते होणार नाही. कार्यकर्त्यांनी विचार करावा की उभं आयुष्य कोर्टात खेटे घालण्यात वाया घालवायचं का? असंही पेडणेकर म्हणाल्या. देवळावरचे, गावावातले, काकड आरत्यांचे भोंगेही उतरवले. हे हिंदुंना अस्थिर करण्याचं काम आहे, असं त्या म्हणाल्या. मी स्वत: मुंबईत शांतता राखली जावी याकरता फिरणार आहे, असं त्यांनी म्हटलं.
यावेळी राज ठाकरेंच्या भाषणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, मागच्या वेळी भावावर बोलल्यानं बॅकफुटवर जावं लागलं. म्हणून आता पवारसाहेबांवर बोललं गेलं. बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. ते मातोश्रीत होते, असं पेडणकर म्हणाल्या.
बाबरी मशिदीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, बाबरीचा घुमट पडल्यानंतर पळता भुई थोडी झाली. तेव्हा कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. जेव्हा बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं, की बाबरी शिवसैनिकांनी पाडली तेव्हा हे कुठे होते? त्यावेळी तुम्ही का गप्प बसलात, असा सवाही पेडणेकरांनी केला. बाळासाहेबांनी घंटा बडवणारा हिंदु नको सांगितलं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही 27 महिला त्यावेळी तिकडे जात होतो मात्र आम्हाला रोखलं. बहादूर शिवसैनिकांचे रेकॉर्ड, फोटो आहेत. उत्तर प्रदेशचे आधीचे रिपोर्ट तपासले पाहीजे. बाबरी बाबतचा रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीसांच्या आरोपाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, फडणवीसांना विचीत्र स्वप्नदोष आहे. मुन्नाभाई चित्रपटामध्ये दाखवला तसा केमिकल लोचा अनेकांमध्ये झालाय, असं त्या म्हणाल्या. पेडणेकर म्हणाल्या की, नारायण राणेंना कुणी सांगा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात. तेव्हा बाळासाहेबांच्या आधी रिपोर्टींग उद्धव ठाकरेंनाच करायला लागायचं. आता चष्म्याचा नंबर आणि कानाचं मशिन बिघडलंय का? असा टोला पेडणेकर यांनी लगावला.