लोकल सेवा सुरु, खासगी कर्मचारी मात्र बसच्या रांगेतच!
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरु झाली असली तरी खासगी कर्मचाऱ्यांना मात्र बसशिवाय पर्याय नाही. खासगी कर्मचारी पहाटेपासूनच बसच्या रांगेत आहेत. यांचे दिवसातले आठ तास प्रवासातच जात आहेत. त्यामुळे बसची संख्या वाढवण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
कल्याण : एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजपासून रेल्वेसेवा सुरु झालेली असली, तरी खासगी कर्मचारी मात्र अजूनही बसच्याच रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण एसटी डेपोमध्ये आजही चाकरमान्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
कल्याण एसटी डेपोत पहाटे पाच वाजल्यापासून या रांगा लागतात. कल्याण आणि आसपासच्या शहरातून मुंबईला जाणारे खासगी कर्मचारी मोठ्या प्रमाणात कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असून सध्या त्यांना बसचा एकमेव पर्याय आहे. मात्र बससाठी सुद्धा त्यांना दीड तास रांगेत उभं राहावं लागतं. त्यानंतर अडीच तासांचा मुंबई प्रवास, अन् संध्याकाळी परतीचा प्रवासही असाच ठरलेला.
या चाकरमान्यांचे दिवसातले आठ तास प्रवासात जात असून 9 ते 10 तास काम आणि उरलेल्या वेळेत त्यांना कुटुंबाच्या जबाबदरीसह अन्य कामं पाहावी लागत आहेत. राज्य सरकारने आमचा विचार करुन ट्रेन नको, तर किमान बसेसची संख्या तरी वाढवावी, अशी मागणी या खासगी नोकरदार वर्गाने केली आहे.
लोकल सुरु केल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांकडून सरकारचे आभार
मुंबईत काम करणाऱ्या सरकारी आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी आजपासून मुंबई लोकल पुन्हा एकदा धावू लागली आहे. आज पहिल्याच दिवशी कल्याण रेल्वे स्थानकातून शेकडो प्रवाशांनी लोकल प्रवास केला. यावेळी लोकल सेवा सुरु केल्यानंतर प्रवाशांनी सरकारचे आभार मानले.
मुंबईत काम करणारे बहुतांशी सरकारी कर्मचारी हे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा परिसरात राहणारे आहेत. राज्य सरकारने सरकारी कार्यालयं मिशन बिगिन अगेननंतर सुरु केली असली, तरी या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे आजपासून फक्त सरकारी आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला ओळखपत्र बघून, तसंच थर्मल स्कॅनिंग करुन प्रवेश दिला जात आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून (15 जून) सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील. सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे. शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल. Unlock 1.0 | Mumbai Local Train | फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरु