BMC : मुंबईच्या प्रश्नांसाठी कल्याणचे खासदार BMC मुख्यालयात; खासदार श्रीकांत शिंदे यांची पालिका आयुक्तांशी चर्चा
BMC News : बोरिवली- मागाठाणे विभागातील काही प्रश्नांसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.
मुंबई : मुंबई उपनगरातील नागरिकांच्या (Mumbai) प्रश्नांसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Kalyan MP Dr. Shrikant Shinde) यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची भेट घेत चर्चा केली. बोरिवली पूर्वेतील (Borivali) शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे ( MLA Prakash Surve ) यांच्या मागाठाणे मतदारसंघ क्षेत्रातील विविध समस्यांबाबत ही चर्चा झाली.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या समस्या सोडवण्याकरिता मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC Commissioner) यांच्यासोबत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदार क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 12 मधील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत चर्चा झाली.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले की, माझ्या विभागात आता पुढील पाणी अजिबात साचणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही महत्त्वाचे विषय हे माझ्या मतदारसंघातील होते त्यावर आज बैठक लागलेली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्दशनास हे प्रश्न आणून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर लवकरच तोडगा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.
पालिका आयुक्तांना आम्ही पत्र दिलं होत. मतदारसंघातील समस्या घेऊन हे निवेदन होते आणि त्यावर काम करण्याची विनंती केली होती, असेही त्यांनी सांगितले.
काही प्रभागात अरुंद रस्ता असल्याने बस किंवा इतर कुठल्याही मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत. समतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या आहेत. हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी आम्ही केलेली आहे. गोराई गावातील रस्त्याचा एक प्रश्न होता तोही सोडवण्याचा निर्णय आज झाला असल्याचे आमदार सुर्वे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत याआधीदेखील मुंबईतील विविध प्रश्नांबाबत मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेत चर्चा केली आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईवरही लक्ष केंद्रीत केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यासह मु्ंबईकडेही आपला मोर्चा वळवला आहे. खासदार शिंदे यांनी मुंबईत शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केलं होतं. त्या माध्यमातून मुंबईतील विविध शाखांना भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला.