फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन फरार होण्याचा प्रयत्न अयशस्वी
Kalyan Crime : ट्रेनच्या दरवाज्यात उभ्या राहणाऱ्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्याने मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे.
कल्याण: लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसाच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपीने पोलिसाच्या हाताला चावा घेतला, मात्र तरीही पोलिसांनी त्याला पकडलेच. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ही घटना घडली असून अजय अर्जुन कांबळे असं या चोरट्याचं नाव आहे.
न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभे राहू नका, मोबाईल पाहू नका, सतर्क रहा असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.
लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हाताला फटका मारत त्यांचा मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी अशा घटना घडत असलेल्या फटका पॉईंटच्या ठिकाणी गस्त वाढवली होती. अंबरनाथमधील रहिवासी असलेले मनिष होटचंदानी सोमवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात पकडून ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रक क्रॉस करत असल्यामुळे लोकलचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत ट्रॅकशेजारी उभ्या असलेल्या आरोपीने आपल्या हातातील लाकडी दांड्याचा फटका होटचंदानी यांच्या हातावर मारला त्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला. खाली पडलेला मोबाईल उचलून पळून जाण्याच्या तयारीत चोरटा असतानाच फटका पॉंईटवर सध्या वेशात तैनात असलेल्या रेल्वे पोलीस शिपाई केदार यांनी त्याला पकडले.
पोलिसांनी पकडताच चोरट्याने केदार यांच्या हाताचा चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अवस्थेत देखील केदार यांनी त्याला पकडून ठेवले. या आरोपीच्या नावावर टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन तर खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दुल वाल्मिक यांनी सांगितले. या आरोपीला रेल्वे न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha