Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी RSS, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं म्हटलं होतं यावरुन त्यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक झाली आहे.
Javed Akhtar Controversy: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानची प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत टीकेची झोड उडवली आहे. त्याचसोबत भारतातील आरएसएस (RSS), विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरुन त्यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या जुहूमधील घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. शिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आज दुपारी 12 वाजता घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात जाऊन आमचा प्रखर विरोध दर्शवीत जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पाडणार असल्याचं राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
आज दुपारी 12 वाजता घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात जाऊन आमचा प्रखर विरोध दर्शवीत #JavedAkhtar यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पडणार
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) September 5, 2021
काय म्हणाले होते जावेद अख्तर
जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी आरएसएस आणि इतर संघटनांची तुलना तालिबानशी केल्याने आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. जावेद अख्तर म्हणाले की, "ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत."
भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं. जावेद अख्तर म्हणाले की, "तालिबान आणि त्यांच्या सारखं वागायची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याचं स्वागत केलं आहे. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टीच्या मागे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात."
भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करु शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही नाही आणि भविष्यातही कधी तालिबानी बनू शकणार नाही असा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :