Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; चौथ्या मृताची ओळख पटली, अजमेर शरीफहून परतताना झाला गोळीबार
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेला हल्ला दहशतवादी आहे. आरोपीचे मोबाईल आणि गॅझेट तपासावे अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केली आहे.
Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चौथ्या मृतकाची ओळख पटली आहे.सय्यद सैफुदिन(43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तो हैदराबादच्या बाजारघाटचा रहिवासी आहे. मूळच्या कर्नाटक बिदरचे रहिवासी असलेला सैफुदिन हा गेल्या पंधरा वर्षापासून हैदराबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यातली सर्वात लहानी मुलगी तर अवघ्या सहा महिन्यांची आहे
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) गोळीबाराची घटना घडली, ज्यात आरपीएफ शिपायाने आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या घटनेतील तीन जणांची ओळख पटली होती. मात्र एका मृतदेहाची ओळख काल रात्री पटली. सय्यद सैफुदिन याचे हैदराबादमध्ये मोबाईल दुरुस्तीचे त्यांचे छोटे दुकान होते.जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो अजमेर शरीफवरुन परतत होते.त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी द्या आणि तिन्ही मुलींना पंचवीस लाख रुपये द्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबासह आलेले हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे. तर हा दहशतवादी हल्ला आहे. आरोपीचे मोबाईल आणि गॅझेट तपासावे अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केली आहे.
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये काल झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी चेतन सिंगला बोरिवली कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी जीआरपी पोलिसांनी आतापर्यंत १० ते १५ प्रवाशांचे जबाब नोंदवले आहेत. शिवाय जीआरपी आरोपी चेतन सिंगचे कॉल रेकॉर्ड देखील तपासणार आहेत. चेतनसिंह गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आलं. चेतनसिंह या प्रकरणात मंगळवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आलं. एक्स्प्रेसमधील काही कोचमधलं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलं असून त्याच्या निरीक्षणाचंही काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी आरोपी चेतनसिंहसाठी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टानं चेतनसिंहला सात दिवसांची म्हणजे सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चेतनसिंह हा मनोरुग्ण होता की, तो तणावाखाली होता याचा तपास पोलीस करणार असल्याची माहिती वकीलांनी दिली आहे.
चेतन सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशमधील हाथरसचा आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली होती. तो मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात आहे. त्याचं पोलीस ठाणं हे लोअर परळ आहे. रविवारी रात्री दुसऱ्या एका ट्रेनमध्ये ड्यूटीवर होता. त्या ट्रेनमधून तोे सुरतला उतरला. त्यानंतर त्यानं काही वेळ त्यानं आराम केला, आणि मग पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी ड्यूटीचा भाग म्हणून तो जयपूर एक्स्प्रेसमध्ये चढला. त्याच्यासोबत आणखी दोन हवालदार आणि त्यांचे वरिष्ठ टीकाराम मीणा देखील होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर रेल्वे स्थानकावरून ट्रेन पास होत असताना चेतननं गोळीबार केला.