(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai News : स्वच्छ भारत सर्वेक्षणात मोठा घोटाळा? टेंडर काढण्याआधीच मर्जीतील ठेकेदारांना कामे, राष्ट्रवादीकडून भांडाफोड
Navi Mumbai City : सद्या शहरात स्वच्छ भारत सर्वेक्षणा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे चालू असून ती विना टेंडर सुरू असल्याचं समोर आलं आहे.
Navi Mumbai Palika : नवी मुंबई महापालिकेच्या अजब कारभाराची गजब गोष्ट समोर आली आहे. सद्या शहरात स्वच्छ भारत सर्वेक्षणा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे चालू असून ती विना टेंडर सुरू आहेत. याबाबतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून याचा भांडाफोड करीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी नवी मुंबई मनपा सज्ज झाली आहे. स्वच्छते बरोबर सुंदर शहर बनविण्यासाठी कोट्यवधीची कामे गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहेत. मात्र हे करीत असताना चक्क विना टेंडर कामे करून नंतर टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचे समोर आले आहे. शहरात एकूण 45 कोटी पर्यंत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत कामे करण्यात येत आहेत.
यासाठी भिंतींना रंग रोंगोटी करणे, रस्त्याच्या दुभाजकावर कारंजे बसविणे, मुख्य चौकात फ्लेमिंगो बसविणे, मैदानांमध्ये शोभेचे पुतळे उभारणे, नक्षीदार भिंत उभारणे अशी अनेक कामे या स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत करण्यात येत आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, सीबीडी या भागात जवळपास तीन हजारांच्यावर कामे काढण्यात आली आहेत. कामे काढल्यानंतर महानगर पालिका कडून टेंडर प्रकाशीत केले जाते. टेंडरमध्ये भाग घेतलेल्या अधिकृत ठेकेदारांना कामे देऊन ती पूर्ण केली जातात. मात्र नवी मुंबई महानगर पालिकेत स्वच्छ भारत सर्वेक्षणाचा बाव करत, याचा आधार घेत चुकीच्या पध्दतीने कामे केली जात असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्याक्ष नितीन चव्हाण यांनी उघड केले आहे.
12 मार्च रोजी निघालेल्या टेंडरच्या ठिकाणांवर जाऊन पाहिले असता ही कामे आधीच पूर्ण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिकारी वर्गाकडून आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळावित यासाठी आधीच कामे करवून घेतली जात आहेत. यामुळे कामांचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. संबंधीत अधिकार्यांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या टेंडर घोटाळ्या प्रकरणी महानगर पालिका शहरअभियंता संजय देसाई यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
महानगर पालिकेने टेंडर काढण्याआधीच झालेली कामे -
सायन पनवेल हायवेवरील एल पी उड्डाणपुलाखाली करण्यात आलेली रंगरंगोटी | खर्च - 16 लाख रूपये |
नेरूळ येथील फकीरा मार्केटसमोर उभारण्यात आलेले कारंजे | खर्च - 8 लाख 53 हजार |
नेरूळ सेक्टर-9 मधील चौकात बसविण्यात आलेल्या फ्लेमिंगोच्या प्रतिकृती | खर्च - 5 लाख 59 हजार |
जुईनगर येथील बाळासाहेब आंबेडकर उध्यानात बसविण्यात आलेला महिलेचा स्टॅच्यू | खर्च - 3 लाख 1 हजार |
हे ही वाचा-
- नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
- Maharashtra Heat Wave : मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्माघाताची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी?
- नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha