नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. 20 एप्रिलनंतर आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होईल.
![नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार Mango arrives at Navi Mumbai APMC have increased, we will have to wait till April for affordable mangoes नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/18a4e03b6afb514c50857adf428f59de_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली असून रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र सामान्यांना परवडणाऱ्या आंब्यासाठी एप्रिल महिन्यात वाट पाहावी लागणार आहे.
यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आता काही प्रमाणात आवक वाढली असली तरी आंब्याचे दर मात्र पेटीमागे 2 हजार ते 5 हजारांपर्यंत आहेत. 20 एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे.
सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून पुढील महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
हंगामातील पहिला हापूस डिसेंबर महिन्यात नवी मुंबई एपीएमसीमध्ये!
कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी डिसेंबर महिन्यात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली. कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा आणला होता. या हंगामातील पाहिले 25 डझन आंबे 20 डिसेंबर रोजी बाजार समितीमध्ये दाखल झाले. या आंब्यांची व्यापाऱ्यांकडून पूजा करत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळाला.
नोव्हेंबरमध्ये मलावी देशातील आंबा बाजारात
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर महिन्यात मलावी देशातील आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आले होते. घाऊक बाजारामध्ये 1500 रुपये प्रति किलो दराने हा आंबा विकला गेला. पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा हा मागील चार वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग आणि आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी 2010 मध्ये हापूस आंब्याची रोपे घेऊन तेथे 700 एकर जागेत या आंब्याची लागवड केली होती. मागील 4 वर्षांपासून भारतात या आंब्याची आयात होत असून कोकणच्या हापूसची चव असल्यामुळे आंबे प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)