मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं महत्वाचं पाऊल; तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी अनोखा उपक्रम
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ( Chief Electoral Officer Shrikant Deshpande) मुंबई किन्नर ट्रस्टच्या सात पारंपरिक दयारांच्या म्हणजे घराण्यांच्या गुरूंसोबत चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.
मुंबई : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे( Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी तृतीयपंथीयांच्या (third gender) भायखळा इथल्या लकी कंपाऊंड या निवासी परिसराला भेट दिली. या भेटीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई किन्नर ट्रस्टच्या सात पारंपरिक दयारांच्या म्हणजे घराण्यांच्या गुरूंसोबत चर्चा करून, तृतीय पंथीयांना मतदार नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. या अडचणींवरच्या उपाययोजना, मतदार नोंदणी केल्याने तृतीय पंथीयांना होऊ शकणारे फायदे, नोंदणीसाठी या समाजाकडून आवश्यक असलेले सहकार्य याविषयी देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
राज्यभरात केवळ 3 हजार 700 तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी
राज्यात तृतीयपंथीयांची संख्या सात ते आठ लाख असली, तरी सद्यःस्थितीत राज्यभरात केवळ 3 हजार 700 तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी केली आहे. तृतीयपंथीयांना अधिकारापासून वंचित राहावे लागणे, यामागे त्यांची अत्यल्प मतदार नोंदणी हेदेखील एक कारण आहे, असं ते म्हणाले. ही परिस्थिती बदलावी आणि मताधिकारापासून वंचित असलेल्या तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करता यावी, यासाठी त्यांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.
तृतीयपंथीयांचे प्रश्न आणि समस्या वेगळ्या
श्रीकांत देशपांडे म्हणाले की, तृतीयपंथीयांचे प्रश्न आणि समस्या वेगळ्या आहेत. त्याबाबत राज्यातल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना माहिती व्हायला हवी म्हणून, राज्यभरातले तृतीयपंथीयांचे गुरू, शासकीय विभाग आणि सामाजिक संस्था यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करायचा विचार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रितपणे सादर करता यावा, यासाठी शिष्यवृती देण्याची योजना निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विचाराधीन आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
निवडणूक अधिकारी कार्यालयानं मानले आभार
तृतीय पंथीयांना मतदार म्हणून हक्क मिळवून देण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालय करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तृतीयपंथीयांच्या गुरूंनी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासनही दिले. मुंबई किन्नर ट्रस्ट आणि किन्नर मॉ संस्था या संघटनांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरू, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर मॉ संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.