Weekend Lockdown | ठाण्यात भाजी घेण्यासाठी झुंबड, तर गावी परतण्यासाठी परप्रांतीयांची गर्दी
वीकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजीपाला खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळाली. तर दुसरीकडे परप्रांतीय नागरिकांनीही आपल्या गावी जाण्यासाठी स्टेशनवर गर्दी केली होती.
ठाणे : ठाण्यातील मुख्य भाजी मंडईमध्ये काल (9 एप्रिल) संध्याकाळी तुफान गर्दी बघायला मिळाली. शुक्रवारी संध्याकाळी वीकेण्ड लॉकडाऊन सुरु होत असल्याने आधीच जास्त प्रमाणात भाजीपाला घेण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे परप्रांतीय नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये गर्दी केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्या ठाणे स्टेशनवर आल्यानंतर खचाखच करुन पुढे जात होत्या.
चिंतामणी चौकाच्या बाजूलाच असलेल्या भाजी मंडईमध्ये सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नव्हते. भाजी विक्रेते जास्तीत जास्त भाजी कशी विकता येईल आणि आपला नफा कसा होईल हे पाहत होते. तर नागरिक देखील सर्व निर्बंध झुगारुन भाजी विकत घेत होते. त्या गर्दीत अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. संध्याकाळी चार साडेचार वाजल्यापासून ही गर्दी होती, मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर देखील अनेक भाजीविक्रेते भाजी विकत होते. यावेळी पालिका प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना रोखण्यासाठी उपस्थित नव्हता. आठ वाजून गेल्यानंतर पोलिसांनी हे मार्केट अखेर बंद केले.
ठाण्यात वीकेण्ड लॉकडाऊनला भाजी विकायची की नाही याबाबत देखील गोंधळाचे वातावरण आहे. एकीकडे राज्य सरकारने भाजीपाला मार्केट सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर ठाणे पालिका आणि पोलिसांनी मार्केट बंद राहिल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन मार्केटमध्ये गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.
दुसरीकडे लॉकडाऊनच्या भीतीने अनेक परप्रांतीय पुन्हा आपल्या गावी जायला निघाले आहेत. मिळेल ती गाडी पकडून, मिळेल त्या ठिकाणी उभे राहून हे प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याचे नियम पाळले जात नाहीयेत. हेच चित्र आज ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वर दिसले. वाराणसीला जाणारी कामायनी एक्सप्रेस जेव्हा प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा प्रवाशांची झुंबड उडाली. या गाडीत बसायला आणि उभे राहायला देखील जागा नव्हती. हीच परिस्थिती इतर बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांची दिसून आली.