Antilia Explosives Scare | 2013मध्ये अंबानींना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा छडा लावण्यात मुंबई पोलीस अपयशी
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, 2013 मध्येही अंबानी कुटुंबियांना धमकी मिळाली होती. अंबानींच्या मरीन ड्राईव्ह येथील मेकर चेंबर कार्यालयात एक धमकीचं पत्र आलं होतं. कोणीतरी इंडियन मुजाहिद्दीनच्या वतीनं एक धमकीचं पत्र पाठवलं होतं. परंतु, या प्रकरणाचा छडा मुंबई पोलीस लावू शकले नव्हते.
मुंबई : सहा दिवस उलटूनही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावरील स्फोटक असलेली गाडी कोणी ठेवली याचा शोध लागू शकलेला नाही. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा रक्षकांचे जबाबही याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, 2013 मध्येही अंबानी कुटुंबियांना धमकी मिळाली होती. अंबानींच्या मरीन ड्राईव्ह येथील मेकर चेंबर कार्यालयात एक धमकीचं पत्र आलं होतं. कोणीतरी इंडियन मुजाहिद्दीनच्या वतीनं एक धमकीचं पत्र पाठवलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पत्रात अंबानींना धमकी देताना सांगण्यात आलं होतं की, जर तू तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मदत करणं सुरु ठेवलं तर आम्ही तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. कारण ते गेल्या अनेक दशकांपासून आमच्या निशाण्यावर आहेत. तसेच धमकीच्या पत्रात पुढे एक मागणीही करण्यात आली होती. पत्रात म्हटलं होतं की, जर इंडियन मुजाहिद्दीनचे ऑपरेटिव्ह दानिशला रिलीज केलं तर आम्ही अंबानी आणि त्यांच्या संपत्तीला कोणतीच हानी पोहोचवणार नाही.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता. त्यानंतर अनेक लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले होते. पण जवळपास दीड महिन्यानंतर मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही, त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तिथेच थांबवला. तेव्हापासून आतापर्यंत अंबानींना आलेलं धमकीचं पत्र नेमकं कोणी पाठवलं होतं? याचा शोध घेण्यास मुंबई पोलीस असमर्थ ठरले.
तपासाच्या नव्या पद्धतीचा वापर
क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली होती. त्यावेळी फॉरेंसि विभागाकडे एक नवं तंत्रज्ञान आलं होतं. ज्याचा वापर करुन कोणत्याही पेपरवरील फिंगर प्रिंट्स मिळवणं शक्य होतं.
हे धमकीचं पत्र आलं त्यावेळी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलिसांनी अंबानींना आलेल्या धमकीच्या पत्राला किती लोकांनी हात लावला होता. त्या सर्वांचे फिंगर प्रिंट्स मिळवले होते. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी हे तंत्रज्ञान नवीन होतं, यासंदर्भात कोणालाच काहीच माहिती नव्हती. त्यामुळे धमकीचं पत्र देणाऱ्या व्यक्तीने हँड ग्लोव्सचा वापर केला असण्याची शक्यता अत्यंत कमी होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला त्या धमकीच्या पत्रावर अनेक फिंगर प्रिंट्स मिळाल्या होत्या. त्यावरुन आम्ही अनेक संशयित, इंडियन मिजाहिद्दीनचे हँडल्स आणि काही कैद्यांच्या रेकॉर्ड्ससोबत मॅच करुन पाहिले. परंतु, कोणाच्याच फिंगरप्रिंट्ससोबत मॅच झाले नाहीत. पोलिसांनी त्यावेळीही टेक्निकल आणि ह्यूमन इंटेलिजेंसचा वापर केला होता. पण काहीच हाती लागलं नव्हतं.
दरम्यान, याप्रकरणी एफआयआर दाखल होऊ शकला नव्हता. पोलिसांनी केवळ चौकशी केली होती आणि जर एखादी महत्त्वाची माहिती मिळाली असती तर त्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन संबंधित व्यक्तीला अटक करण्यात येणार होतं. दरम्यान, त्या धमकीच्या पत्राच्या तपासात अद्यापही कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :