लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
रामोड यांच्या निलंबनाच्या अहवालात, त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये.
मुंबई : लाचखोर आय ए एस अधाकारी अनिल रामोड यांच्या निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर शासनाने त्यांना पुन्हा एकदा नियुक्ती दिली आहे. अनिल रामोड (Anil Ramod) यांना 9 जून 2023 रोजी 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग विकासासाठी घेतल्या जात आहेत, त्यांना जास्त मोबदला देण्याच्या बदल्यात 8 लाख रुपयांची लाच घेताना रामोड यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता तब्बल दीड वर्षानंतर त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून केली आहे. त्यामुळे, गेल्या दीड वर्षांपासून सेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांना (IAS) आता सेवेची संधी मिळाली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून अधिकारी रामोड यांना जून 2023 मध्ये निलंबित करण्यात आले होते. पुण्याच्या (Pune) तत्कालीन विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं.
रामोड यांच्या निलंबनाच्या अहवालात, त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन असेल, असे आदेशात म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांना पुण्यातील येरवाडा तुरुंगातही टाकण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेची संधी देण्यात आली आहे.
निलंबन कालावधी संपुष्टात आल्यानंतर, राज्य शासनाकडे रुजू झाल्याने शासनाने आपली नियुक्ती, सदस्य सचिव, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर या पदावर करण्यात आली आहे. कुणाल कुमार, भाप्रसे हे अध्ययन रजेवर गेल्यामुळे रिक्त असलेल्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून आपली नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्रच डॉ. अनिल रामोड यांना अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या सहीने प्राप्त झाले आहे. त्यामुळे, लाचखोर राहिलेल्या रामोड यांना पुन्हा एकदा सेवेची संधी मिळाली. रामोड यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
सतिश कुमार खडकेंना जबाबदारी
सतिश कुमार खडके यांनाही शासनाने संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर लहू माळी, भाप्रसे यांच्या जागी नियुक्ती दिली आहे. हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी, आपण नवीन पदाचा कार्यभार माळी, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच संचालक, विमान चालन, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभारही पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडेच सोपविण्यात येत आहे. तरी सदर पदाचा अतिरिक्त कार्यभारही आपण माळी, भा.प्र.से. यांच्याकडून त्वरीत स्विकारावा, असे बदली आदेशात म्हटले आहे.
अजीत शेख यांचीही बदली
यांसह अजीज शेख यांची शासनाने व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई या रिक्त पदावर बदली केली आहे. तरी, आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे आदेश अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.