मानखुर्दमधील घटनेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई करणार
Maharashtra News : महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
Maharashtra News : महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये काल रात्री घडलेल्या तोडफोडीच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील जनतेला गृहमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले की, "आपल्या देशात सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे. हल्ली राजकीय फायद्यासाठी दोन समाजाच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नुकसान होतंय. विकासाबाबत विचार करायला हवा. लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात. पण हल्ली समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे."
मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत जमावाकडून तोडफोड, परिस्थिती नियंत्रणात
मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत काल रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल (रविवारी) 15-20 जणांच्या जमावानं परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
रविवारी रात्री मुंबईतील मानखुर्द परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही लोकांनी एकत्र येऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. रात्री 10 वाजता 15 ते 20 जणांच्या जमावानं एकत्र येऊन गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले. या घटनेबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महादेव कोळी यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, रात्री 10 ते 11 जणांचा जमाव परिसरात एकत्र आला आणि तोडफोड सुरु केली. एकूण किती गाड्यांची तोडफोड झाली याची माहिती पंचनाम्यानंतरच कळू शकेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :