मुंबई परिसरातील खाडी पट्यात तीन नवीन जेट्टी उभारण्यास हायकोर्टाची परवानगी
मुंबईत सध्या बोरीवली ते गोराई, मार्वे ते मनोरी आणि वर्सोवा ते मढ अशा छोट्या-छोट्या पल्ल्यात जलवाहतूक केली जाते. मात्र या नव्या जेट्टींमुळे मुंबईच्या अंतर्गत भागातील जलवाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल. तसेच भविष्यात पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईतही जलवाहतूक सुरु करता येईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबई : मुंबईतील शहरांतर्गत जलवाहतुकीच्या विकासासाठी हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात मिळून तीन नवीन जेट्टी उभारण्याची परवानगी दिली आहे. गोराई, मनोरी आणि घोडबंदर परिसरात या तीन नव्या जेट्टी उभारल्या जाणार आहेत.
कायद्यातील निर्देशांनुसार सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या परिसरात बांधकामासाठी हायकोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यानुसार कांदळवनाच्या परिसरातील या विकास कामासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती एन. जमदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा प्रकल्प पूर्णपणे जनतेच्या हिताचा असल्याचं यावेळी प्रशासनानं हायकोर्टाला पटवून दिलं.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून लवकरात लवकर पर्यायी वाहतुकीचे मार्ग तयार करणं ही काळाची गरज बनली आहे. ज्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय हा उत्तम ठरु शकतो.