कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचं व्यवस्थापन आणि अंत्यसंस्कार कसे केले जातात? : हायकोर्ट
काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना बाधित मृतदेहांच्याच बाजूला कोरोनाच्या इतर रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अत्यंत व्हायरल झाला असून त्यामुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयात कोरोना बाधित मृतदेहांच्या बाजूलाच इतर कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला. याची दखल आता मुंबई उच्च न्यायालयानंही घेतली आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णालयांमध्ये कोविड-19 नं दगावलेल्यांच्या मृतदेहांचं व्यवस्थापन आणि अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते?, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. सायन रुग्णालयासारखी घटना पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घ्या, असेही न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला बजावले आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील परिस्थितीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये कोरोना मृतदेह जमिनीवर ठेवलेले किंवा कोरोना रुग्णांच्या बाजूच्याच खाटांवर ठेवलेले दिसत होते. असे भयावह प्रकार पुन्हा होऊ नये आणि या प्रकारांबाबत चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेतून केली गेली आहे. सुनावणी दरम्यान हायकोर्टानंही या घटनांबाबत चिंता व्यक्त करत असे प्रकार व्यवस्थापनाकडून यापुढे होता कामा नये, असं मत व्यक्त केलं आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबईतील पोलीस स्थानकांचं सॅनिटायझिंग, मुंबईभर काम करणाऱ्या पाच टिम्स
पालिकेनं आपली बाजू मांडताना याबाबत चौकशी सुरु केली असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही, अशी माहिती हायकोर्टाला दिली. मात्र या याचिकेची व्याप्ती वाढवत हायकोर्टानं राज्यभरातील रुग्णालये आणि स्थानिक प्रशासनांकडून कोरोना मृतदेहांचे व्यवस्थापन आणि त्यावर अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते?, याची माहिती 1 जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले असून या याचिकेवर पुढील सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्य सरकारच्या फी वाढ करण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या 40 हजारांच्या इंजेक्शनचा खर्च नवी मुंबई मनपाने करावा : प्रवीण दरेकर