एक्स्प्लोर
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर प्रतिदिन 450 मेट्रिक टन घनकचरा टाकण्यास हायकोर्टाची परवानगी
महापालिकेच्या कांजुरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर सध्या खूप ताण पडत असल्याने तिथला दररोजचा सुमारे 450 मेट्रिक टन कचरा देवनार येथे टाकण्याची परवानगी महापालिकेने हायकोर्टाकडे मागितली होती.

A
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडवर प्रतिदिन 450 मेट्रिक टन घनकचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबर 2019 पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र ही शेवटची मुदतवाढ असून यापुढे ती मिळणार नाही, त्यामुळे त्याआधी पर्यायी व्यवस्था करावी, असं स्पष्ट निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील घनकचऱ्याचे नियोजन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही. गेल्या पाच-सहा वर्षांपासून महापालिकेकडून यासंदर्भात केवळ मुदत वाढ मागण्यात येत आहे. मात्र असं न करता महापालिकेने आता कायमस्वरुपी देवनार येथील क्षेपणभूमीचा वापर थांबवण्याचा निर्णय घ्यायला हवा, असं स्पष्ट मतही यावेळी हायकोर्टाने नोंदवलं आहे. महापालिकेच्या कांजुरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर सध्या खूप ताण पडत असल्याने तिथला दररोजचा सुमारे 450 मेट्रिक टन कचरा देवनार येथे टाकण्याची परवानगी महापालिकेने हायकोर्टाकडे मागितली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने ही परवानगी अखेर मंजूर केली आहे. तसंच अंबरनाथजवळील करवले गावामध्ये मुंबईसाठी तयार होणाऱ्या प्रस्तावित क्षेपणभूमीच्या जमिनीबाबत राज्य सरकारने काय कार्यवाही केली आहे? यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
आणखी वाचा























