Eknath Shinde : मुसळधार पावसाचा कहर, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; ठाण्यात रेड अलर्ट, दोन दिवस सुट्टी जाहीर; घराबाहेर पडू नका आवाहन, शिंदेंही ऑन फिल्ड
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मुंबई : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून ती धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. परिणामी कुर्ला येथील क्रांती नगर आणि कुर्ला पूल परिसरात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (NDRF) टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली असून कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी तयारी ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळच्या शाळांमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांसाठी शाळांमध्ये अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आणखी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाणे जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने पुढील दोन दिवस आवश्यक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकांच्या जीवापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही, असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री, सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व संबंधित टीम्स फील्डवर काम करत आहेत. लोकांचे जीवित सुरक्षित राहावे आणि कोणतीही हानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे पुन्हा आवाहन करण्यात आले आहे. महापालिका यंत्रणा पूर्णपणे कामात आहे.
ठाण्यातही पाणी भरलं होतं, शहरातील बऱ्याचशा सखल भागांमध्ये पाणी भरलं आहे. मी काल आयुक्तांशी बोललो. सहा तासांमध्ये 200 mm पाऊस पडला आहे आणि 24 तासात तीनशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. कमी वेळेमध्ये जास्तीचा पाऊस या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काही लोक कंट्रोल रूममध्ये आहेत, काही लोक फील्डवर काम करत आहेत. होल्डिंग पॉईंट देखील भरलेले आहेत, कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, धोका ओळखून जवळपास तीनशे पेक्षा जास्त लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवले आहे, जिथे धोका आहे त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते काम महानगरपालिका करत आहे. मुंबई जीवीत हानी होऊ नये आणि मालमत्तेचा नुकसान होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेचे, प्रशासनाचे सर्वाधिकारी फिल्डवर काम करत आहेत, अशी माहितीही शिंदेंनी दिली आहे.
मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी ३.९ मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगन नथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी ३.९ मीटर वरून आता ३.६ मीटर इतकी झाली आहे. मुसळधार पावसाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
बीएमसीने कार्यालयांना सुट्टी जाहीर
उपनगरांत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने कहर केला असून भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीची नोंद केली आहे. विक्रोळी परिसरात तब्बल २५५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर भायखळा, सांताक्रुज, जुहू आणि वांद्रे परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सतत दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा खाडीत भरतीला सुरुवात झाली आहे. खाडीकिनारी असणाऱ्या बोटींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत कार्यालयांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (१९ ऑगस्ट २०२५) रोजी मुंबई शहर व उपनगरांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खासगी कार्यालयांनाही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत.
नागरिकांना आवाहन
बीएमसीने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे आणखी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
























