एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 6 ते 9 जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत सहा ते नऊ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा स्कायमेटनं दिला आहे.
मुंबई : उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या या गोड बातमीमुळे मुंबईकर स्वप्नरंजनात हरवलेला असतानाच सर्वसामान्यांसह प्रशासनाला खडबडून जाग आणणारी बातमी समोर आली आहे. पावसाला सुरुवात होते न होते, तोच मुसळधार पावसाचं सावट मुंबईवर आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईत मुसळधार पावसाचा धोका संभवत आहे. सहा ते नऊ जून या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा स्कायमेटनं दिला आहे. त्यामुळे या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडण्याची चिन्हं आहेत.
26 जुलै 2005 रोजी झालेला पावसाचा प्रकोप मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. मुसळधार पावसाने फक्त वाहतुकीचीच दाणादाण उडाली नाही, तर अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि कित्येक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला होता. दुसरीकडे, गेल्याच वर्षी 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाचं आणि त्यामुळे विस्कळीत झालेल्या जीवनमानाचं उदाहरणही ताजं आहे.
मुंबईकरांनी मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळा सुरु होताच पूरस्थिती आ वासून उभी राहणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचीही आता धावाधाव सुरु झाली आहे.
पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विविध योजना आखल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाडेश्वर स्वत: रस्त्यावर उतरुन नालेसफाईची पाहणी करत आहेत. मुंबईपुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानापुढे मुंबई पालिका सज्ज असल्याचं महापौर छाती ठोकून सांगत आहेत.
खरं तर, यंदा पावसात मंबई तुंबली तर त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही असं म्हणत महापौरांनी यापूर्वीच हात वर केले होते. त्यामुळे राज्य शासनानेही पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्सुनामी, वादळ, गारपीट, अतिवृष्टीसारखी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत देण्यासाठी राज्य शासनानं एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे मुसळधार पावसानं पूरपरिस्थिती उद्भवल्यास लोकांना तात्काळ दिलासा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement