Rajesh Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती, त्याच्या दीडपटीने व्यवस्था करा, अशी सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास 3800 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत 700 मेट्रिक टन एका दिवसाला ऑक्सिजन तिसऱ्या लाटेत ज्यादिवशी लागेल तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यानुसार हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 15 ऑगस्टनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.
मंगलकार्यालयांना सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
सिनेमागृह, मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंद
सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
Maharashtra Unlock Highlights : महाराष्ट्र अनलॉकबाबत राज्य मंत्रिमंडळाचे दहा मोठे निर्णय