Mumbai Local Train Accident : अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी, मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा, टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका
Mumbai Local Train Accident : सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

Mumbai Local Train Accident : एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात असतानाच दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जाताना दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशी बॅगामध्ये अडकून थेट ट्रॅकवर कोसळले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहिल्यांदा पुष्पक एक्स्प्रेसमधून पवाशी पडल्याची चर्चा होती. मात्र, धावत्या लोकलमधून प्रवास करताना दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि खाली कोसळले. या अपघातानंतर लोकलमध्ये चिरडणाऱ्या निष्पाप जीवांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि पोकळ आश्वासनांची खैरात पुन्हा चर्चेत आली आहे. या अपघातानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा अपघात नसून सरकारने घेतलेले बळी असल्याची टीका केली आहे.
हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी आहेत. आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली! दोन प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत ही प्रार्थना.
विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात
त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहेत. या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.
पुष्पक एक्स्प्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही
दरम्यान, मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात लोकल रेल्वेवर झाला आहे. दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली. सकाळी साडे नऊ वाजता दरम्यान ही घडना घडली. अपघातग्रस्त दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशी आहेत. वळणावर दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. पाठीवरील बॅगांची गुंतागुंत होऊन ही घटना घडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशी कोसळल्याची चर्चा होती. मात्र, पुष्पक एक्स्प्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे.






















