पप्पू कलानी आयुष्यभर जेलमध्येच राहणार, पप्पूच्या शिक्षामाफीचा अर्ज शासन समितीने फेटाळला
पप्पू कलानी याच्यावर आजवर गंभीर स्वरुपाचे 65 गुन्हे दाखल असून त्याची सुटका झाली, तर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती भटीजा यांनी व्यक्त केल्यानं कलानी याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

कल्याण : उल्हासनगर शहर आणि ठाणे जिल्ह्याला एकेकाळी हादरवून सोडणारा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याला आयुष्यभर जेलमध्येच राहावं लागणार आहे. कारण शासन समितीने त्याचा शिक्षा माफ करण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
पप्पू कलानी हा सध्या खुनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वयाच्या सत्तरीत असलेला पप्पू कलानी सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. 1990 साली झालेल्या इंदर भटीजा हत्याप्रकरणात पप्पू याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात त्याने 1990 ते 1997 आणि त्यानंतर 2019 ते 2019 अशी एकूण साडेतेरा वर्ष कारागृहात घालवली आहेत.
सत्र न्यायालयानं त्याला सुनावलेली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. मात्र कारागृहातील वर्तणूक चांगली असल्यास 14 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर शिक्षा माफ करून कैद्याची मुक्तता करण्याची सरकारी तरतूद आहे. त्यामुळे आता आपली शिक्षा माफ करण्याची मागणी येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांच्या माध्यमातून पप्पू कलानीने सरकारी समितीकडे केली होती.
मात्र मृत इंदर भटीजा यांचे भाऊ कमल भटीजा यांनी याबर हरकत घेतली. पप्पू कलानी याच्यावर आजवर गंभीर स्वरुपाचे 65 गुन्हे दाखल असून त्याची सुटका झाली, तर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती भटीजा यांनी व्यक्त केल्यानं कलानी याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
पप्पू कलानी हा माजी आमदार असून त्याची पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत. मुलगा ओमी कलानी यांची टीम ओमी कलानी भाजपच्या दावणीला असून सून पंचम ओमी कलानी या उल्हासनगरच्या महापौर आहेत. त्यामुळे राजकीय वजन वापरून पप्पूच्या परतीचा मार्ग मोकळा करण्याचा कलानी परिवाराचा प्रयत्न होता. मात्र आता कलानी याला संपूर्ण आयुष्य कारागृहातच घालवावं लागणार आहे.
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha






















