एक्स्प्लोर
मुंबईतील गोरेगावात नवी 'मायक्रो सिटी', मोतीलाल नगराचा कायापालट
गोरेगावमधील मोतीलाल नगरमध्ये पुनर्विकासातून सर्व सुविधांनी युक्त असे छोटे शहर उभारण्याची योजना आहे. म्हाडाकडून या जागेचा संपूर्ण कायापालट केला जाणार आहे
![मुंबईतील गोरेगावात नवी 'मायक्रो सिटी', मोतीलाल नगराचा कायापालट Goregaon in Mumbai to get new identity, Motilal Nagar to get cluster redevelopment मुंबईतील गोरेगावात नवी 'मायक्रो सिटी', मोतीलाल नगराचा कायापालट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/08163526/Mumbai-City.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस (प्रातिनिधीक फोटो)
मुंबई : मुंबईच्या उपनगरांमधल्या बजबजपुरीला कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी एक विशेष बातमी आहे. गोरेगावला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे, ती म्हणजे 'मायक्रो सिटी'ची. गोरेगावमधल्या अनेक वर्षे रखडलेल्या 'मोतीलाल नगर'च्या विकासाला आता वेग मिळणार आहे.
अरुंद गल्ल्या, बैठ्या चाळी, अधून-मधून डोके वर काढणारे टॉवर, कचऱ्याचे ढीग, पाण्याची बोंब आणि सगळे रस्ते आपल्याच मालकीचे असल्यासारखे हात-पाय पसरणारी अतिक्रमणं... हे चित्र मुंबईच्या उपनगरांचं. मुंबई शहरात इंच-इंच जागेला सोन्याचा भाव आला. जुना मुंबईकर मुंबईबाहेर येऊन राहायला लागला. त्यावेळी वस्त्या वसल्या, पण त्याचं नियोजन कितपत चांगलं झालं, हा आजही यक्षप्रश्न आहे. गोरेगावमधलं मोतीलाल नगर त्यापैकीच एक आणि आता याच मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी होणार आहे.
मोतीलाल नगरमधील नव्या मायक्रोसिटीचं वैशिष्ट्यं काय?
- येत्या ऑक्टोबरमध्ये प्रकल्पाची पायाभरणी
- मोतीलाल नगर वसाहतीचा होणार पुनर्विकास
- रुग्णालय, वृद्धाश्रम, महिलांसाठी हॉस्टेलही
- परवडणाऱ्या घरांना आवर्जून स्थान
- तब्बल 30 हजार कोटींची योजना
मोतीलाल नगरमध्ये पुनर्विकासातून सर्व सुविधांनी युक्त असे छोटे शहर उभारण्याची योजना आहे. त्यासाठी म्हाडाने यापूर्वीच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची (पीएमसी) नियुक्ती केली होती. या पीएमसीने संपूर्ण आराखडा तयार केला असून काही महिन्यांतच प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली जाईल. या प्रकल्पामुळे अद्ययावत मायक्रो सिटी उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे असं म्हाडाकडून सांगितलं जात आहे.
या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन म्हाडाकडून केले जाणार आहे. म्हाडाला आता नियोजन प्राधिकरणाचा दर्जा लाभला असल्याने मुंबई महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी रहिवाशांना विश्वासात घेण्यात यावं, अशी स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. तसंच मायक्रो सिटी तयार करण्याआधी उपनगरांमध्ये खरोखरच पायाभूत सोयी-सुविधा आहेत का? त्याचं नियोजन आधी करणं गरजेचं आहे.
मोतीलाल नगर कसं वसलं?
1961 साली मोतीलाल नगर वसवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते म्हाडा वसाहतीचं उद्घाटन झालं. त्यांनी या वसाहतीला मोतीलाल नगर नाव दिलं. गलिच्छ वस्ती निर्मूलन अंतर्गत ही वसाहत वसवण्यात आली. सध्या इथे 3,700 घरे आहेत. मराठी, गुजराती मध्यमवर्गीय इथे राहतात. 15000 जणांची वस्ती असल्याची माहिती आहे. मोतीलाल नगर क्र. 1,2,3 असा सुमारे 142 एकरचा परिसर आहे. पुनर्विकासातून सुमारे 18 हजार अतिरिक्त घरे अपेक्षित आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)