ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
प्रेमाचा प्रस्ताव न स्वीकारल्याने तरुणीची हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. काही तासात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : ठाण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रोडवर सकाळी 11च्या सुमारास तरूणीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. प्रेमाचा प्रस्ताव न स्वीकारल्याने ही घटना घडली आहे. प्राची विकास झाडे असं या 20 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. आरोपी आकाश पवारला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राची आज सकाळी आपल्या स्कूटीवरून आरटीओ कार्यालयासमोरील रोडवरून जात होती. आरोपी आकाशने तिला रस्त्यात रोखलं आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्लानंतर पाठीमागून आलेल्या त्याच्या सहकाऱ्याने त्याला आपल्या दुचाकीवर बसवलं आणि दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला लोकांनी तातडीनं उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला. प्राचीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपी आकाशचा पोलिसांनी कसून शोध घेतला. काही तासातच पोलिसांनी आकाशला अटक केली. नौपाडा पोलीस ठाण्यात आकाशविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्राची ठाण्यातील कोपरी कॉलनीतीलन किशोरनगर परिसरात राहत होती. ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये प्राची आणि आकाशची मैत्री झाली. आकाश प्राचीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. तो नेहमी तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करीत असे. आकाशच्या या त्रासाला कंटाळून दीड महिन्यापूर्वी प्राची व तिच्या मैत्रिणीनी कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्राचीच्या वडिलांनी केला आहे.























