घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर डीजीपी कार्यालयानं दिलेल्या अहवालानंतर खालिद यांना गेल्या महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं.
Ghatkopar Hoarding Case: मुंबई : मुंबईतील (Mumbai News) घाटकोपर होर्डिंग (Ghatkopar Hoarding Case) पडून अनेकांचा मृत्यू झालेला. या अपघातानंतर (Accident News Updates) वादात आलेले निलंबित आयपीएस अधिकारी (Suspended IPS Officer) कैसर खालिद (Kaiser Khalid) यांच्या अडचणीत मात्र आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) कैसर खालिद यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीनं गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याकडे खालिद यांच्याविरोधात तक्रार केल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. खालिद यांच्यावर रेल्वेच्या जमिनीवर होर्डिंग्ज लावण्यास परवानगी दिल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप होता. फिर्यादीचा दावा आहे की, त्यानं खालिद यांना त्यांच्या अमेरिकेच्या सहलीसाठी 30 लाख रुपये रोख आणि 8000 डॉलर्स दिले होते. ही तक्रार 7 मे 2024 रोजी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याकडे पाठवण्यात आली होती.
निष्काळजीपणामुळे होर्डिंग दुर्घटना घडली
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्यानं 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डीजीपी कार्यालयानं दिलेल्या अहवालानंतर खालिद यांना गेल्या महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. सूत्रांनी सांगितलं की, अहवालात घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील गंभीर अनियमितता अधोरेखित करण्यात आली होती. तसेच, निष्काळजीपणामुळेच होर्डिंग दुर्घटना घडल्याचंही अहवालातून अधोरेखित करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, एसीबी खालिद यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे.
पैशाच्या बदल्यात होर्डिंगचे कंत्राट देण्याची चर्चा
साकीनाका येथे राहणाऱ्या एका खासगी व्यक्तीनं डीजीपी कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, खालिद यांच्यावर रेल्वे आयुक्तपदाचा गैरवापर करून तक्रारदाराची 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दादर टिळक ब्रीज, दादर रेल्वे पोलीस कॉलनी किंवा घाटकोपर येथील रेल्वे परिसर या ठिकाणी होर्डिंगचं कंत्राट देण्याचं आश्वासन खालिद यानं दिलं आणि पैसे घेतले, असा तक्रारदाराचा दावा आहे.
10 लाख रुपये खालिदच्या घरी पोचवण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे, तर 20 लाख रुपये शिवाजी नगरमधील अर्शद खानला देण्यात आलं, जो खालिद यांचा जवळचा सहकारी आणि त्याच्या पत्नीच्या कंपनीत संचालक आहे.
तक्रारदारानं व्हॉट्सॲप चॅटही केलं
तक्रारीत खालिद यांना दिलेले पैसे आणि तारखा, तसेच USD 6,000 USA सहलीसाठी आणि खालिद यांच्या खरेदीचा तपशील आहे. अमेरिकेतील खालिद यांच्या कुटुंबातील सदस्याच्या खात्यात 2000 USD हस्तांतरित केल्याचा दावाही करण्यात आला आहे. तक्रारदारानं आपल्या चार पानी तक्रारीसोबत व्हॉट्सॲप चॅटही जोडले आहेत.