(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाऊदच्या साथीदाराला ठाण्यातून अटक
मोहम्मदविरुद्ध कुर्ला, विलेपार्ले, नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, हफ्ते वसूली यांसारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद हा दाऊद इब्राहिमचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक मोहम्मद अहमद खानला ठाण्याच्या क्राईम ब्रान्चने अटक केली आहे. मोहम्मदला मुंब्रा परिसरातून पोलिसांनी अटक केली. मोहम्मदवर हत्या, खंडणीसारख्या 14 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
ठाणे क्राईम ब्रान्च 1 चे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मुंब्रा येथील शिमला पार्कमध्ये नाव बदलून कुटुंबासह राहत होता. क्राईम ब्रान्चचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मोहम्मदबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचून पोलिसांनी मोहम्मदच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मोहम्मदविरुद्ध कुर्ला, विलेपार्ले, नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, हफ्ते वसूली यांसारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद हा दाऊद इब्राहिमचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.
एका हत्या प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असताना 1997 त्याची जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून तो फरार होता आणि नाव बदलून राहत होता. तसेच कर्नाटकमध्ये पठान युसून उस्मान या नावाने त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर तो मस्कतमध्ये लपून बसला होता. काही महिन्यांपासून मोहम्मद मुंब्रा येथे राहत होता.
दाऊदच्या डी कंपनीसोबत काम केल्यानंतर तो छोटा राजनसाठीही काम करत असल्याचं समोर आलं. छोटा राजनसोबत काम केल्याने दाऊदचे गुंड मला मारतील याची भीती त्याला वाटत होती.