Ganeshosthav: गणेशोत्सावासाठी एकसमान नियमावलीची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली
राज्यभरात एकसामन नियम आणि मार्गदर्शक तत्व जारी करण्याची याचिकेत मागणी केली होती. साल 2016 प्रमाणेच पुन्हा दाखल केलेली जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली.
Ganeshosthav: मुंबईसह राज्यातला सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वांना एकसमान नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टानं नुकतीच फेटाळून लावलीय. यापूर्वी याचिकाकर्त्यांनी साल 2016 मध्ये दाखल केलेली याच आशयाची याचिका फेटाळून लावल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
नोंदणीकृत नसलेल्या गणपती मंडळांना धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देऊ नका. धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय गणेशोत्सवात देणगी गोळा करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी. गणेश उत्सवात लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत. मूर्ती तयार करण्यासाठी आणि बायोडिग्रेडेबल सामग्री वापरण्यासाठी एकसमान पद्धती अमलांत आणावी अशा विविध मागण्यांसह याचिकाकर्ते पुष्कराज इंदूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पुष्कराज इंदूरकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. सण उत्सवाच्या काळात राज्य सरकारकडून सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत?, याबाबत कोणतीही निश्चित माहिती याचिकाकर्त्यांनी दिलेली नाही तसेच याचिकाकर्त्यांनीही नव्यानं कोणत्याही उपाययोजना याचिकेतून सुचवलेल्या नाहीत. असं निरीक्षण हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवलं आहे. तसेच यासाठी याचिकाकर्त्यांनी केलेली एक याचिका याआधी 2 सप्टेंबर 2016 रोजी फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच मागण्यांसाठी दाखल केलेली दुसरी जनहित याचिका मान्य करता येणार नाही, असं नमूद करून हायकोर्टानं ही जनहित याचिका फेटाळून लावली.