Ganesh Visarjan 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात
कोरोनाच्या दोन वर्षानंतर उद्या मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर कडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.
मुंबई : उद्याच्या गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2022) पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. सकाळपासून साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात असणार आहेत, अशा माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. जवळपास सर्वच मोठ्या मंडळांचा भव्य विसर्जन सोहळा उद्या पार पडणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसह भाविकांची मोठी गर्दी मुंबईच्या चौपाट्यांवर शिवाय विसर्जन स्थळावर होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विसर्जनाच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर उद्या मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. मोठा जल्लोष विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाच्या विसर्जन स्थळी पाहायला मिळेल. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर कडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. गर्दीवर नियंत्रण त्यासोबतच वाहतुकीवर नियंत्रण असे दुहेरी आव्हान विसर्जनाच्या दिवशी मुंबई पोलिसांवर असणार आहे. त्यासाठीच विशेष नियोजन बंदोबस्त संदर्भात मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे
मुंबईत कसा असणार बंदोबस्त?
- एसअरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या टीम तैनात असतील त्यासोबतच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत
- 600 पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात मुंबईच्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत
- मुंबईतील 77 महत्त्वाचे विसर्जन स्थळ आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत
- क्राईम ब्रान्च आणि एटीएस अधिकारी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी विशेष बंदोबस्तावर आहेत
- लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असेल. यामध्ये सह पोलीस आयुक्तांच्यासोबत अडीच हजार पोलीस तैनात असणार आहेत
- होमगार्डशिवाय स्वयंसेवी संस्था, एनसीसी विद्यार्थीसुद्धा पोलिसांसोबत वाहतूक हाताळण्यास विसर्जनवेळी मदतीसाठी असणार आहेत
- मुंबईच्या विसर्जन स्थळाशिवाय महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
- खाजगी कंपन्यांकडून सुद्धा सीसीटीव्ही विसर्जनाच्या दिवशी लावण्यात आले आहेत
मुंबई महापालिका प्रशासनासोबत मुंबई पोलिसांनी समन्वय साधून विसर्जनाच्या दिवशी विशेष नियोजन केला आहे जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये व निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा पार पडावा