भिवंडीत मैत्रिणीकडून परतणाऱ्या महिलेवर शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार, चौघांना बेड्या
मैत्रिणीकडे कामाची चौकशी करुन घरी परतताना पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप 42 वर्षीय महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून एकाचा शोध सुरु आहे.

भिवंडी : भिवंडी शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन शेजारी शस्त्राचा धाक दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
भिवंडी शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला आहे. इथे मजुरीसाठी हजारो स्त्री-पुरुष येत असतात. लॉकडाऊन काळात काम नसल्याने नव्या कामाच्या शोधात एक 42 वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रीणीकडे नव्या कामाच्या चौकशीसाठी सायंकाळी गेली होती. तिथून रात्री उशिरा ती एकटीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन शेजारील मुनिसुरत कम्पाऊंड इथल्या झाडाझुडपाच्या आडवाटेने आपल्या घरी जात होती. रस्त्यात पाच मद्यपी युवकांच्या टोळक्याने या महिलेला शस्त्राचा धाक दाखवत तिला झाडाझुडपात नेलं आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
ही महिला बेशुद्धावस्थेत त्याच ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी या महिलेची माहिती नारपोली पोलिसांना समजताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या महिलेच्या हाता आणि बोटांना जखमा झाल्या आहेत. महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत, तिला ठाण्यातील कळवामधल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
या प्रकरणाचा तपास नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथकाने केला आणि अवघ्या काही तासात चार आरोपींना अटक केली तर एकाचा शोध सुरु आहे. माँटी कैलास वरटे (वय 25 वर्षे), विशाल कैलास वरटे (वय 23 वर्ष), कुमार राठोड (वय 25 वर्षे), अनिल कुमार शयाम बिहारी गुप्ता (वय 28 वर्षे) या चौघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे.
नारपोली पोलीस स्टेशनमधील भादवि कलम 376(ड), 341, 324, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पोलिस अधिक तपास करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
