संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही, घरवापसीनंतर बाळासाहेब सानप यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब सानप यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई : नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
"भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला. मधल्या काळात थोडासा दुरावा झाला पण संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे. येत्या काळात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपकडून जास्तीत जास्त काम करेन," अशा शब्दात बाळासाहेब सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सानप यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी : चंद्रकांत पाटील विचार आणि ध्येयाने काम करणारी माणसं फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे ते भाजपात आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. सोबतच बाळासाहेब सानप यांच्यामध्ये राज्यात काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. एकोप्याने काम करा. कार्यकर्त्यांमध्ये दुही निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला देत भाजपमध्ये असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी न करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी दिली.
बाळासाहेबांमुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल : देवेंद्र फडणवीस बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद आहे. समज-गैरसमज तयार झाले आणि त्यातून अंतर निर्माण झालं, त्यामुळे ते काही काळ आमच्यामध्ये नव्हते पण मनाने ते आमच्यामध्ये होते. भाजप माझा पक्ष आणि माझं जीवन इथेच घालवायचा आहे, असं बाळासाहेब सानप यांनी मला सांगितलं. त्यासाठी कुठलंही निगोसिएशन करावं लागलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. "कुंभमेळ्याच्या वेळी गिरीश महाजन यांच्या मदतीला बाळासाहेब धावून आले आणि त्यांनी सर्व अडचणी दूर करुन काम केलं. बाळासाहेब आल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही," असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, "नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. येत्या काळात भाजपचा खासदारही तिथे निवडून येईल."
"भाजपचे आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या विरोधकांकडून उठवल्या जातात. पण भाजपचे सर्व आमदार इन्टॅक्ट आहेत. या देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा युपीए नाही तर नरेंद्र मोदी आहेत हे सर्वांना माहिती आहे. धोक्याने आलेलं सरकार किती काळ चालतं, कसं चालतं ते सगळ्यांना माहिती आहे. तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यानंतर सगळ्यात मोठी स्पेस भाजपला मिळणार आहे. ज्यावेळी भाजपला कॉर्नर केलं त्यावेळी भाजपा वाढला आहे. तीन पक्षांनी भाजपला मोठं होण्याची संधी दिली आहे. एकट्याच्या भरवशावर सत्ता असणारा पक्ष भाजपला निर्माण करायचा आहे. देशातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपा जिंकत आहे. आगामी काळात अनेक लोकांना सोबत घेणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब सानप यांचा परिचय बाळासाहेब सानप हे नाशिक महापालिकेतील भाजपचे पहिले महापौर आहे. नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद आहे. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. नाशिक महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भाजपमधून 2014 मध्ये नाशिक पूर्वमधून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सानप यांचा पराभव झाला. त्यानंतर बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काही नेत्यांमुळए पक्ष सोडत असल्याचं सांगितलं. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.