(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापना
भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहीजण अद्यापही बेपत्ता आहेत.
मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी चिपळूणमधील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर 4 जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाने सखोल चौकशीसाठी पथक स्थापन केलं आहे.
तिवरे धरण फुटल्याने झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाला दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं होतं. अलोरे-शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहीजण अद्यापही बेपत्ता आहेत.
जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा
तिवरे धरण धुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती असून ही एक दुर्घटना होती. अधिकारी आणि काही ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर खेकड्यांनी धरण पोखरल्यामुळे धरण फुटल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती
तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठी मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली.
संबंधित बातम्या